शिंगणापूर घाटात पाठलाग करून दुचाकी चोरास पकडले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २१ फेब्रुवारी २०२५ | फलटण |
फलटण ग्रामीण पोलिसांनी एका दुचाकी चोरास पाठलाग करून शिंगणापूर घाटात पकडले असून त्यास सातारा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक जावली (ता. फलटण) परिसरात रात्रगस्त करीत असताना फलटणहून शिंगणापूरच्या दिशेने निघालेल्या एका मोटारसायकलस्वारची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यास थांबविण्याचा इशारा केला असता त्याने भरधाव वेगात गाडी शिंगणापूरच्या दिशेने नेली.

या प्रकारामुळे तो इसम संशयास्पद असल्याची खात्री झाल्यामुळे पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. शिंगणापूर घाटातील एका वळणावर पोलिसांनी त्यास गाठून ताब्यात त्यास ताब्यात घेतले. त्यावेळी युवराज आकोबा निकम (वय ५५ वर्षे, रा. पिंपोडे बु., ता. कोरेगाव, जि. सातारा) असे त्याने आपले नाव सांगितले.

पोलिसांनी त्याचे रेकॉर्ड तपासले असता त्याच्याविरुध्द वाहन चोरीचे शंभरहून अधिक गुन्हे दाखल असल्याचे दिसले. यावरून पोलिसांनी त्याच्याकडून होंडा शाईन मोटारसायकल (एम एच ११ सीसी ३४८५) ही सुध्दा चोरीची असल्याची लक्षात आल्यामुळे त्याबाबत सखोल चौकशी केली असता ही मोटारसायकल सातारा पोलीस ठाणे हद्दीत चोरीस गेल्याची माहिती मिळाली.

युवराज निकम यास दुचाकी चोरीप्रकरणी पोलिसांनी पकडून त्यास सातारा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक समीर शेख सो, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या सूचनांनुसार पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जी. बी. बदने, पोलीस हवालदार वैभव सूर्यवंशी, पोलीस हवालदार नितिन चतुरे, पोलीस नाईक अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, तुषार आडके पोलीस कॉस्टेबल हनुमंत दडस, श्रीकांत खरात यांनी केली.


Back to top button
Don`t copy text!