पत्रकारांनी जेष्ठांकडून मार्गदर्शन घ्यावे; समाजाभिमुख लेखणीची गरज – प्रा. विकास शिंदे


बिजवडी येथे पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रा. विकास शिंदे यांनी पत्रकारांनी जेष्ठांकडून मार्गदर्शन घेत समाजाभिमुख व निर्भीड पत्रकारिता करावी, असे आवाहन केले.

स्थैर्य, बिजवडी (माण), दि. २० जानेवारी : पत्रकारांनी कायम जेष्ठ पत्रकारांकडून मार्गदर्शन घेत राहिले पाहिजे. नव्याने पत्रकारितेत येताना अभ्यास प्रगल्भ असावा, तसेच परिसराची ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक जाण असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन लोकमतचे फलटण तालुका प्रतिनिधी व भारतीय पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. विकास शिंदे यांनी केले. ते भारतीय पत्रकार संघाच्या पत्रकार दिनानिमित्त बिजवडी (ता. माण) येथे आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करत होते.

भारतीय पत्रकार संघाच्या वतीने बिजवडी येथे पत्रकार दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकारितेची सामाजिक जबाबदारी, अभ्यासपूर्ण लेखन आणि निर्भीड मांडणी यावर मान्यवरांनी विचार मांडले.

प्रा. शिंदे पुढे म्हणाले की, समाजातील विविध प्रश्न निर्भीडपणे मांडण्यासाठी पत्रकार अधिकाधिक समाजाभिमुख झाले पाहिजेत. “लेखणीतून बदल घडवण्याची ताकद पत्रकारितेत दिसली पाहिजे,” असेही त्यांनी स्पष्ट केले. माण तालुक्याची भूमी जशी सकस अन्नधान्य देते, तशीच समाजासाठी पोषक व दर्जेदार वैचारिक निर्मितीही येथे झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज व आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी जेष्ठ पत्रकार बापूराव गुंजवटे यांनी सध्याच्या पत्रकारितेसमोरील आव्हानांवर भाष्य करत बदलत्या परिस्थितीस सामोरे जाण्यास पत्रकार सज्ज असणे गरजेचे असल्याचे सांगितले.

युवा कवी अविनाश चव्हाण यांनी पत्रकारितेतील उपेक्षित घटकांना बळ दिले पाहिजे, तेव्हाच चौथा स्तंभ अधिक मजबूत होईल, असे मत व्यक्त केले. भारतीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संदीपकुमार जाधव यांनी पत्रकारांच्या हितासाठी संघ सदैव तत्पर असून, राष्ट्रीय पातळीवर पत्रकारिता नेण्यासाठी संघात सहभागी होण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमास जेष्ठ पत्रकार बापूराव गुंजवटे, जिल्हाध्यक्ष संदीपकुमार जाधव, पंचायत समिती माणचे माजी सभापती बाळासाहेब रणपिसे, मामुशेठ विरकर, शिवसेना (उबाठा) जिल्हाध्यक्ष संजय भोसले, हनुमंत भोसले, संपादक साम्राज्य नायक प्रशांत सोनवणे, चारुशीला माने, दादाराजे भोसले, महेंद्र भोसले, आत्माराम शिंगाडे, विक्रम जगताप, माधुरी भोसले, दादासाहेब भोसले, आकाश दडस यांच्यासह बिजवडी व पंचक्रोशीतील नागरिक व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!