
स्थैर्य, मुंबई, दि.२७: आधीच कठीण काळातून मार्गक्रमण करत असलेल्या अनिल अंबानी यांच्या अडचणीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. स्टेट बँक ऑफ इंडियासह देशातील ३ प्रमुख बँकांनी अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या बँक खात्यांना ‘फ्रॉड’ जाहीर केले आहे. एसबीआयसह यूनियन बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओवरसीज बँकेनं आरकॉमला ‘फ्रॉड’ म्हटलंय. एसबीआय आणि यूनियन बँक ऑफ इंडियानं रिलायन्स टेलिकॉम लिमिटेडलाही ‘फ्रॉड’ म्हटले आहे. एसबीआय आणि अन्य दोन राष्ट्रीयीकृत बँकांनी एनसीटीएल मुंबईकडून रिलायन्स इन्फ्राटेलच्या रिझोल्युशन प्लॅनला मंजुरी देण्यात आल्यानंतर अवघ्या काही आठवड्यांमध्येच हे कठोर पाऊल उचललं आहे.
रिलायन्स जिओ ग्रुप हा रिलायन्स डिजिटल प्लॅटफॉर्म असलेल्या रिलायन्स इन्फ्राटेलसाठी एक यशस्वी आवेदक ठरला आहे. कर्जदात्यांना रिलायन्स डिजिटल कडून 4 हजार 400 रुपयांचं कर्ज मिळेल. देशभरात रिलायन्स इंफ्राटेलचे 43 हजार टॉवर आणि 1 लाख 72 हजार किलोमीटरचं फायबर नेटवर्क आहे.
आरकॉमच्या रिझोल्यूशन प्लॅनला परवानगीची प्रतीक्षा
आरकॉम आणि आरटीएलच्या रिझोल्यूशन प्लॅनला मंजुरी मिळाली आहे. आता रिझोल्यूशन प्लॅनला नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल मुंबई (एनसीटीएल)कडून मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा आहे. या दोन्ही कंपन्यांच्या विक्रीतून बँकांना 18 हजार कोटी रुपये मिळणार आहेत.
रिलायन्स होम फायनान्स कंपनीची विक्री प्रक्रिया
उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपची रिलायन्स होम फायनान्स कंपनीची विक्री प्रक्रिया चालू आहे. ही कंपनी खरेदी करण्याची बाजारातील बड्या कंपन्यांनी तयारी दाखवली आहे. ज्यामध्ये अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीसह ऑथम इन्व्हेस्टमेंट प्रा. लिमिटेड सारख्या बड्या कंपन्यांचा समावेश आहे. रिलायन्स होम फायनान्सला खरेदी करण्यासाठी 6 कंपन्यांनी बोली लावली आहे. रिलायन्स होम फायनान्स कंपनीसाठी कोटक स्पेशल सिच्युएशन फंड, अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी, ऑथम इन्वेस्टमेंट प्रा.लिमिटेड यासह अन्य कंपन्यांनी बोली लावली आहे.
रिलायन्स होम फायनान्सवर कर्जाचा बोझा आहे. कंपनी विक्रीला काढण्याचं कारण म्हणजे, इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शिएल सर्व्हिसेस लिमिटेड आहे. चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीच्या शेवटी कंपनीची 7729 कोटी रुपये थकबाकी होती. यामध्ये 4778 कोटी रुपयांच्या एनपीएचा समावेश आहे. 31 ऑक्टो. 2020 पर्यंत अंबानींवर 20 हजार कोटी रुपयांचं कर्ज होतं.