दैनिक स्थैर्य । दि. २५ एप्रिल २०२३ । मुंबई । मुंबईतील रस्त्याच्या मेगा कॉन्ट्रॅक्ट अनियमतेबद्दल शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरेंनी मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना खरमरीत पत्र लिहिलं आहे. पालिका आयुक्त आणि पालिका प्रशासनाने रस्ते घोटाळ्यावर मौन पाळत एका पद्धतीने उत्तरे न देता या घोटाळ्याला संमती दिली आहे का असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, हा अपारदर्शक प्रशासनाचा मोठा घोटाळा आहे. ज्याची सर्वस्वी सूत्रे सांभाळता ते नगरविकास मंत्री त्या बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे. BMC च्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर मौन बाळगले आहे. निविदा जारी करताना स्पर्धात्मक बोली किंमतीवर देण्यात आल्या की बरोबरच्या किंमतीत? या निविदानुसार आता किती रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत? मुंबई वाहतूक पोलीस आणि इतर विभाग व संस्थांकडून ना हरकत प्रमापत्र प्राप्त झाली आहेत? मार्च २०२२ पासून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपलेला असताना, त्यांच्या अनुपस्थितीत ४०० किमी लांबीच्या रस्त्यांची कामे कोणी प्रस्तावित केली आहेत? या प्रश्नांची उत्तरे द्या असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
तसेच ३१ मे २०२३ पर्यंत कामे सुरू झाली नाहीत तर सुधारित कालमर्यादा काय असेल? जी कामे पावसाळ्यानंतर सुरु करण्याचे निर्धारित असेल किंवा ठरवले जाईल अशा कामानांही आगाऊ रक्कम दिली जाईल का? हे प्रश्न मुंबईकरांसाठी महत्त्वाचे आहेत. कारण त्यांच्या कष्टाच्या आणि घामाच्या पैशांतून या ६०८० कोटींच्या प्रस्तावित रस्त्यांच्या कामाचा घाट घातला गेला आहे आणि ५ कंत्राटदारांना संघटित गुन्हेगारी टोळ्यांच्या पद्धतीप्रमाणे वाटेल अशा प्रकारे पूर्ण गुप्तता पाळून ही कामे वाटून देण्यात आली आहेत असा आरोप आमदार आदित्य ठाकरेंनी केला.
दरम्यान, ह्या रस्त्यांच्या कंत्राटदारांच्या चौकशीची मागणी अनेक आमदार, माजी नगरसेवक आणि नागरिकांनी विविध माध्यमांतून केल्याचेही समोर आले आहे. ह्या पत्रांच्या आधारे बीएमसीने कंत्राटदारांना काही कोटींचा दंडही ठोठावला आहे. मात्र, या गलथान कारभाराला जितके कंत्राटदार जबाबदार आहेत तितकीच जबाबदारी बीएमसी प्रशासनावरही आहे. ह्या सा-याप्रकरणात अजून बीएमसीच्या अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. जनतेचा पैसा आणि जनतेच्या ठेवी कुठल्याही ठोस कारणाशिवाय, गरजेशिवाय बेछूटपणे उडवणा-या आणि त्यावर कोणताही अंकूश नसलेल्या ह्या लोकशाहीविरोधी कारभारावर कधी संबंधितांचं आत्मपरीक्षण होईल का? असा प्रश्न नागरिक म्हणून प्रत्येक मुंबईकराला पडतो आहे असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला आहे.