
स्थैर्य, फलट, दि. २१ ऑगस्ट: धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाल्याने नीरा नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात मोठी घट करण्यात आली आहे. कालपर्यंत ७२,००० क्युसेक्सवर पोहोचलेला विसर्ग आता ४०,६४९ क्युसेक्सपर्यंत कमी झाला आहे. यामुळे नीरा नदीकाठच्या गावांना मोठा दिलासा मिळाला असून, पुराचा धोका टळला आहे.
नीरा उजवा कालवा विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, वीर धरणातून होणारा विसर्ग लक्षणीयरीत्या कमी करून २४,९९० क्युसेक्सवर आणण्यात आला आहे. त्याचबरोबर भाटघर धरणातून १०,५०० क्युसेक्स आणि नीरा देवघर धरणातून ४,९०९ क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. पाण्याची आवक कमी झाल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे नदीच्या पाणी पातळीत घट होऊन पूरस्थिती नियंत्रणात आली आहे.
सध्या नीरा प्रणालीतील एकूण पाणीसाठा ९८.८६% इतका आहे. यामध्ये भाटघर आणि वीर धरणे १००% भरलेली आहेत, तर नीरा देवघर धरणात ९८.३८% पाणीसाठा आहे. पावसाने उघडीप दिली असली तरी धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी व नदीपात्रात उतरू नये, असे आवाहन प्रशासनाने कायम ठेवले आहे.
दरम्यान, फलटण तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या नीरा उजवा कालव्यातून शेतीसाठी १,३८२ क्युसेक्स पाणी विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. यामुळे शेती सिंचनाची सोय कायम राहिली आहे.