दैनिक स्थैर्य । दि. २७ ऑगस्ट २०२२ । मुंबई । राज्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये प्रोत्साहन मिळावे, जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे, युवकांनी खेळाकडे आकर्षित व्हावे याकरीता राज्य शासनाने राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मधील पदक विजेत्या क्रीडापटूंच्या बक्षिस रकमेत मोठी वाढ केली असल्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.
मंत्रालयातील मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
मंत्री श्री.महाजन म्हणाले, देशातील पंजाब, हरियाणा राज्यात खेळाडूंना प्रोत्साहनासाठी देण्यात येणाऱ्या बक्षिस रकमेच्या तुलनेत राज्याची रक्कम कमी होती. ती जवळपास 5 पट वाढविण्यात आली आहे. पूर्वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना 10 लाख रुपये देण्यात येत होते. आता ती रक्कम 50 लाख रुपये करण्यात आली आहे. रौप्यपदक विजेत्या खेळाडूंसाठी 7.50 लाख रुपये ऐवजी 30 लाख रुपये करण्यात आली आहे. तर कांस्यपदक विजेत्या खेळाडूंना 5 लाख रुपये ऐवजी 20 लाख रुपये करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे खेळाडूंच्या मार्गदर्शकांच्याही बक्षिसांची रक्कम वाढविण्यात आली आहे. सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंच्या मार्गदर्शकासाठी 12.50 लाख रुपये, रौप्यपदक विजेत्या खेळाडूंच्या मार्गदर्शकांना 7.50 लाख रुपये तर कांस्यपदक विजेत्या खेळाडूंच्या मार्गदर्शकांना 5 लाख रुपये बक्षिस देण्यात येणार आहेत.
बर्मिंगहम येथील राष्ट्रकुल स्पर्धेत राज्यातील 7 खेळाडूंना 8 पदके प्राप्त
बर्मिंगहम येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये एकूण 14 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यापैकी राज्यातील 7 खेळाडूंनी 8 पदके प्राप्त केली आहेत. या खेळाडूंसह त्यांच्या मार्गदर्शकांना 3.50 कोटी रुपये बक्षिस देण्यात येणार आहे. यामध्ये सुनिल शेट्टी याने टेबल टेनिस (पुरुष सांघिक) या खेळामध्ये सुवर्णपदक, चिराग शेट्टी याने बॅडमिंटन (पुरुष दुहेरी) या खेळामध्ये सुवर्णपदक आणि मिक्स सांघिक या खेळामध्ये रौप्यपदक, श्रीमती स्मृती मानधना, श्रीमती जेमिमा रॉड्रिग्स, श्रीमती राधा यादव यांनी क्रिकेट (महिला संघ) या खेळामध्ये रौप्यपदक, संकेत महादेव सरगर वेटलिफ्टिंग (पुरुष 55 कि.ग्रॅ.) या खेळामध्ये रौप्यपदक, अविनाश साबळे ॲथलेटिक्स (3 हजार मिटर स्टिपलचेस) या खेळामध्ये रौप्यपदक प्राप्त केले आहे.
मंत्री श्री. महाजन म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील खेळाडूंशी थेट संवाद साधतात. तसेच पदक विजेत्यांचे प्रत्यक्ष भेटून अभिनंदन करतात. ते खेळांकडे गांभिर्याने बघतात. खेळाडूंसाठी विविध उपक्रम सातत्याने राबवित असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पंजाब, हरियाणा या राज्यातील खेळाडूंना देण्यात येणाऱ्या विविध भत्त्यांसह सोयी – सुविधा राज्यातील खेळाडूंना देण्यात येणार आहे.
ग्रामीण, आदिवासी खेळाडूंना अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याकरीता विविध उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला जाईल. विभाग, जिल्हा, तालुका, क्रीडा संकुलांसाठी देण्यात येणारा निधी आणि सोयी – सुविधा वाढविण्याचा प्रयत्न केला जाईल. यामुळे राज्यातील खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अधिक पदके प्राप्त करुन राज्याची क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठा वाढविण्यासाठी मदत होईल, असेही श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.