दैनिक स्थैर्य । दि. २१ जुलै २०२३ । मुंबई । गेल्या अनेक महिन्यांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिसांचारामुळे विरोधक सातत्याने सरकारवर टीका करत आहेत. यातच आता बुधवारी (19 जुलै) दोन महिलांना विविस्त्र करुन धिंड काढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सरकारविरोधात संतापाची लाट आहे. दरम्यान, आता विरोधकांच्या ‘इंडिया’ (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स) आघाडीतील नेते पुढील आठवड्यात मणिपूरचा दौरा करू शकतात.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोमवारी (24 जुलै) सकाळी संसदेत विरोधी पक्षांच्या बैठकीत तारखेबाबत अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही मणिपूरला जाण्याचे संकेत दिले आहेत. त्या इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहेत. त्यांची दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी मणिपूरला जाण्याबाबत चर्चा झाली आहे.
अधिवेशनात विरोधकांचा गोंधळ
मणिपूर राज्यात सुरू असलेला हिंसाचार आणि महिलांसोबत घडलेल्या घटनेचे पडसाद संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पाहायला मिळत आहेत. विरोधक मणिपूरवर चर्चा घेण्याची मागणी करत असून, आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही दोन्ही सभागृहात गदारोळ पाहायला मिळाला. या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
चार जणांना अटक
मणिपूरमध्ये बुधवारी दोन महिलांना विवस्त्र करुन धिंड काढल्याचा व्हिडिओ समोर आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण 4 मे चा आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. हुइरेम हेरादास सिंग(32) असे मुख्य आरोपीचे नाव आहे. या प्रकरणातील दोषींना सोडले जाणार नाही, असे राज्य आणि केंद्र सरकारने सांगितले आहे.