फलटण तालुक्यात अवकाळी पावसाने बागायती पिके व फळबागांचे मोठे नुकसान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २५ डिसेंबर २०२१ । फलटण । अवकाळी पावसाने दि. २ ते १२ डिसेंबर २०२१ दरम्यान फलटण तालुक्यात शेतातील उभी पिके, फळबागा, भाजीपाला वगैरे १९०५.५८ हेक्टर क्षेत्रातील ४७२६ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असल्याची माहिती तहसीलदार समीर मोहन यादव आणि तालुका कृषी अधिकारी सागर अर्जुन डांगे यांनी दिली आहे.

अवकाळीने तालुक्यातील बागायती पट्टयातील उभी पिके आणि फळ बागांचे नुकसान झाले असून नुकसान भरपाई पोटी प्रचलित नियम, निकषानुसार फळ पिकांसाठी हेक्टरी २५ हजार रुपये आणि बागायती पिकांसाठी हेक्टरी १० हजार रुपये याप्रमाणे ४४४० शेतकऱ्यांच्या १७६१.३४ हेक्टर क्षेत्रातील बागायती पिकांसाठी १ कोटी ७६ लाख १३ हजार ४०० रुपये आणि २७३ शेतकऱ्यांच्या १३७.५४ हेक्टर क्षेत्रातील फळ बागांसाठी ३६ लाख ०६ हजार रुपये असे एकूण २ कोटी १२ लाख १९ हजार ४०० रुपयांची नुकसान भरपाई मिळणे अपेक्षीत असल्याने त्याप्रमाणे मागणी शासनाकडे केली असल्याचे तहसीलदार समीर मोहन यादव आणि तालुका कृषी अधिकारी सागर अर्जुन डांगे यांनी सांगितले आहे.

तरडगाव कृषी मंडलातील १३९० शेतकऱ्यांच्या ४३६.६१ हेक्टर क्षेत्रातील विविध पिकांचा समावेश आहे. त्यामध्ये १३६८ शेतकऱ्यांच्या ४२६.६३ हेक्टर क्षेत्रावरील कांदा, २ शेतकऱ्यांच्या १.२ हेक्टर क्षेत्रावरील मका, ११ शेतकऱ्यांच्या ४.२ हेक्टर क्षेत्रावरील भाजीपाला, २ शेतकऱ्यांच्या ०.६ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, ४ शेतकऱ्यांच्या १.६५ हेक्टरवरील गहु आणि ३ शेतकऱ्यांच्या २.३३ हेक्टर क्षेत्रावरील हरभरा पिकाचा समावेश आहे.

बरड कृषी मंडलातील १७४४ शेतकऱ्यांच्या ८३५.०९ हेक्टर क्षेत्रातील विविध पिकांचा समावेश आहे. त्यामध्ये ३३ शेतकऱ्यांच्या २४.०२ हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष बागा, ९५ शेतकऱ्यांच्या ०.०८ हेक्टर क्षेत्रावरील डाळिंब बागा, २ शेतकऱ्यांच्या ४.२ हेक्टर क्षेत्रावरील आंबा बागांचा, ७ शेतकऱ्यांच्या २.८ हेक्टर क्षेत्रावरील बोर, सीताफळ, पेरु फळबागांचा, १५६० शेतकऱ्यांच्या ७४७.०० हेक्टरवरील गहु आणि ३ शेतकऱ्यांच्या २.३३ हेक्टर क्षेत्रावरील कांदा पिकाचा आणि ४६ शेतकऱ्यांच्या १६.०५ हेक्टर क्षेत्रावरील भाजीपाला, तूर, ज्वारी पिकांचा समावेश आहे.

विडणी कृषी मंडलातील १४६२ शेतकऱ्यांच्या ५९०.५२ हेक्टर क्षेत्रातील विविध पिकांचा समावेश आहे. त्यामध्ये १३०२ शेतकऱ्यांच्या ५१२.९० हेक्टर क्षेत्रावरील कांदा, ७ शेतकऱ्यांच्या २.१५ हेक्टर क्षेत्रावरील भाजीपाला, ८२ शेतकऱ्यांच्या ३८.० हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष बागा, ३५ शेतकऱ्यांच्या २१.०९ हेक्टर क्षेत्रावरील डाळिंब बागा, ११ शेतकऱ्यांच्या ३.७० हेक्टरवरील अंजीर बागांचा समावेश आहे.

फलटण कृषी मंडलातील १३० शेतकऱ्यांच्या ४२.५५ हेक्टर क्षेत्रातील विविध पिकांचा समावेश आहे. त्यामध्ये १११ शेतकऱ्यांच्या ३३.५५ हेक्टर क्षेत्रावरील कांदा, १६ शेतकऱ्यांच्या ७.८० हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष बागा, ३ शेतकऱ्यांच्या १.२० हेक्टर क्षेत्रावरील डाळिंब बागांचा समावेश आहे.


Back to top button
Don`t copy text!