
स्थैर्य, फलटण, दि. २३ नोव्हेंबर : फलटण नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ७ मध्ये महायुतीला मोठे बळ मिळाले आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सौ. आरती दीपक शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यांनी थेट महायुतीचे उमेदवार श्री. अशोकराव जाधव आणि सौ. स्वाती भोसले यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्यामुळे प्रभाग ७ मध्ये महायुतीच्या उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे.
आज प्रभाग क्रमांक ७ मधील हनुमान नगर आणि संत बापूदास नगर येथील शेकडो कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत. या सर्व कार्यकर्त्यांनी माजी खासदार श्री. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार श्री. सचिन पाटील, आणि विरोधी पक्षनेते श्री. समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. फलटण शहर आणि प्रभाग क्रमांक ७ च्या विकासासाठी सर्वजण आता एकजुटीने कामाला लागले आहेत.
महायुतीचे उमेदवार अशोकराव जाधव यांच्याकडे प्रदीर्घ राजकीय अनुभव आणि नगरपालिका प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे. त्यांचा सततचा लोकसंपर्क ही त्यांची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. याच अनुभवामुळे त्यांची उमेदवारी प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण करत आहे आणि नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल मोठा विश्वास आहे.
आजच्या या मोठ्या पक्षप्रवेशानंतर अशोकराव जाधव यांचा विजय आता जवळपास निश्चित झाला आहे. कार्यकर्त्यांचा वाढलेला उत्साह आणि अनुभवी नेत्यांचे पाठबळ यामुळे विजयापासून त्यांना कोणीही रोखू शकत नाही, असा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.

