
स्थैर्य, फलटण, दि. २३ ऑगस्ट : विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत, पैलवान स्वागत काशीद यांची स्वराज संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा आज करण्यात आली. या निवडीमुळे संघटनेला जिल्ह्यात एक तरुण आणि आश्वासक नेतृत्व मिळाले असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या निवडीच्या घोषणेवेळी माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, सातारा जिल्हा बँकेचे संचालक शिवरूपराजे खर्डेकर, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सदस्य सचिन रणवरे, साखरवाडीचे माजी सरपंच विक्रम भोसले, भाजपा नेते जयकुमार शिंदे आणि सुशांत निंबाळकर यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी स्वागत काशीद यांना नवीन पदासाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या नेतृत्वाखाली स्वराज संघटना सातारा जिल्ह्यात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात भरीव कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला. स्वागत काशीद यांच्या निवडीमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. लवकरच जिल्हा कार्यकारिणी जाहीर करून कामाला सुरुवात करणार असल्याचे काशीद यांनी सांगितले.