स्थैर्य, फलटण ०९ : गावाच्या एकजुटीतून आणि सर्वांच्या सहकार्याने एक सुसज्ज विलगीकरण कक्ष उभा राहिल्याने कोरोना बाधीत व त्यांच्या नातेवाईकांच्या मनावरील भितीचे सावट दूर झाल्याने सर्वांनी प्रशासनाचे नियमांचे पालन करुन गावात कोरोना वाढणार नाही याला प्राधान्य देत दाखल रुग्णांची उत्तम काळजी घेतल्याने आतापर्यंत 27 रुग्ण बरे होऊन त्यांना आनंदाने निरोप देऊन घरी पाठविण्यात आले आहे तर अद्याप दाखल असलेल्या रुग्णांची प्रकृती सुधारत आहे, लवकरच त्यांना बरे होऊन घरी पाठविण्यात येईल त्यानंतर बिबी गावाची वाटचाल कोरोना मुक्तीच्या दिशेने सुरु होईल असा विश्वास ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
बिबी येथील या विलगीकरण कक्षाचे उद्घाटन आ. दीपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील उर्फ दत्ता अनपट यांचे हस्ते झाले, त्यांचे मार्गदर्शन व सहकार्य या कक्षास लाभले आहे. पहिल्या दिवशीच 15 रुग्ण दाखल झाले नंतर रुग्ण संख्या 50 पर्यंत पोहोचली, आज केवळ 28 रुग्ण दाखल आहेत.
या विलगीकरण कक्षात 40 बेडची व्यवस्था, उपचारासाठी स्थानिक डॉक्टरांची मदत, आरोग्य विषयक साधने, सुविधा यासाठी प्रा. आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आशा व अंगणवाडी सेविका यांनी तर अन्य व्यवस्था म्हणजे दाखल रुग्णांसाठी सकाळी चहा, नाश्ता, दोन वेळचे जेवण, पिण्यासाठी व आंघोळीसाठी गरम पाणी वगैरे व्यवस्थेसाठी ग्रामपंचायत, मारुती मंदिर देवस्थान ट्रस्ट, तरुण मंडळ, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी मोठी मदत केली.
दररोज सकाळी योगासन प्राणायाम, कबड्डी, क्रिकेट, लगोरी आदी खेळाद्वारे व्यायाम तसेच सायंकाळी प्रवचन, भजन, कीर्तन, व भारुडाचे देखील आयोजन करण्यात येत असून रुग्णांना आनंदी, समाधानी ठेवून त्यांचा आजार बरा होण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी शेखर सिंह, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे पवार, लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वायकर, पोलीस उप निरीक्षक माने वगैरेंनी बिबी विलगीकरण कक्षास भेट देऊन ग्रामस्थांचे कौतुक करताना व्यवस्थेबद्दल मार्गदर्शन व सहकार्य केले आहे.
ग्रामस्थांसमवेत महसूल मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, सरपंच, उप सरपंच, सोसायटी चेअरमन, व्हा. चेअरमन, प्रा. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, प्रा. शिक्षक वगैरे सर्वच घटकांचे मोठे सहकार्य या कामी लाभले आहे.