भूविकास बँकेचे शिक्के उठणार; अर्थसंकल्पामध्ये ९५० कोटी रुपयांची तरतूद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १२ मार्च २०२२ । कोरेगाव । सातारा जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद करण्यात आली आहे. सर्वसामान्यांशी निगडीत असलेले अनेक प्रकल्प मार्गी लावल्याबद्दल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मनपूर्वक धन्यवाद देत असल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले. उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून भूविकास बँकेच्या कर्जाचे शिक्के सातारा व जावली तालुक्यातील शेतकर्‍यांच्या सातबारा उतार्‍यांवर मारण्यात आले होते, आता ते हद्दपार होणार आहेत. अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी ९५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, याविषयी आपण सातत्याने पाठपुरावा केला होता, अशी माहिती देखील आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सातारा जिल्ह्यावर प्रेम असल्याचे प्रकर्षाने या अर्थसंकल्पावरुन जाणवून आले आहे. त्यांनी जिल्हावासियांच्या अनेक मागण्यांना हिरवा कंदील दाखवत अनेक कामे मंजूर केली आहेत, त्याचबरोबर त्यासाठी भरीव निधीची तरतूद देखील केली आहे, याचा मनस्वी आनंद होत आहे, असे स्पष्ट करुन आमदार शशिकांत शिंदे यांनी भूविकास बँकेचा विषय हा शेतकर्‍यांसाठी अत्यंत महत्वाचा होता, त्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत होतो, अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद झाल्याने आता शेतकर्‍यांच्या सातबारावरील शिक्के कायमचे हद्दपार होणार आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

सातारा येथे अपघातग्रस्तांना तातडीने उपचाराची सोय व्हावी, यासाठी ५० खाटांचे ट्रॉमा सेंटर मंजूर करण्यात आले आहे, त्याचबरोबर महिलांसाठी अत्यंत गरजेचे असलेले ५० खाटांचे स्त्री रुग्णालय मंजूर झाल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना आता जवळच आधुनिक उपचार पध्दतीने उपचार मिळणार आहेत. पर्यटन विकासासाठी महाबळेश्‍वरसह परिसरासाठी मोठ्याप्रमाणावर तरतूद करण्यात आली आहे. जलप्रकल्प देखील त्यातून मार्गी लागणार आहेत, असेही आमदार शिंदे यांनी सांगितले.

सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे सातारा येथील प्रतापसिंह हायस्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेतले आहे. या हायस्कूलसाठी १ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. नायगाव, ता. खंडाळा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मभूमीत शाळेसाठी १ कोटी रुपयांचा निधी देऊन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शिक्षणाच्या सर्वांगिण विकासासाठी भरीव योगदान दिले आहे, त्याचबरोबर महापुरुषांचा मान देखील राखला आहे. एकंदरीत महाविकास आघाडी सरकारचा अर्थसंकल्प हा सातारा जिल्ह्यासाठी पर्वणीच आहे, तमाम सातारा जिल्हावासियांच्यावतीने मी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मनपूर्वक धन्यवाद देत असल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!