दैनिक स्थैर्य । दि. १८ डिसेंबर २०२२ । फलटण । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची वाटचाल विश्वगुरु होण्याकडे चालली आहे, त्यांच्याकडे वैश्विक नेतृत्व म्हणुन पाहिले जात आहे. पाकिस्तानी मंत्री बिलावल भुट्टो हे लायकीहीन असुन त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केलेल्या टिकेचा भाजप व माढा लोकसभा मतदार संघाचा खासदार म्हणुन आपण निषेध करत असल्याचे प्रतिपादन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टिकेचा निषेध म्हणुन भाजपच्यावतीने आज फलटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भुट्टो यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारुन त्याचे दहन करण्यात आले, त्यावेळी खासदार निंबाळकर बोलत होते.
लायकी नसलेल्या बिलावल भुट्टोला पाकिस्तानी मंत्रीमंडळातुन बेदखल करा अशी मागणी करुन खा. निंबाळकर म्हणाले, पाकिस्तानच्या मनात भारताविषयी नेहमीच असुया राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनात आणले तर दुसर्या दिवशी पाकिस्तान जगाच्या नकाशावर दिसणार नाही. जगामध्ये भारत सातव्या स्थानावरुन तिसरी महासत्ता म्हणुन उदयास आली आहे, यापरिस्थितीत लायकी नसणारे व दुसर्याच्या भिकेवर जगणारे पाकिस्तान पंतप्रधान मोदी यांच्यावर हकनाक शिंतोडे उडवित असल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बिलावल भुट्टोंच्या निषेधाच्या व पाकिस्तान मुर्दाबादच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. भुट्टो यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारुन त्याचे दहन करण्यात आले.
यावेळी भाजपचे उपजिल्हा प्रमुख जयकुमार शिंदे, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, अनुप शहा, सचिन अहिवळे, तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, माजी नगरसेवक डॉ.प्रविण आगवणे, डॉ. सुभाष गुळवे, स्वागत काशिद, शरद झेंडे, मेहबुब मेटकरी, बबलू मोमीन, संदीप नेवसे, रणजित जाधव, महिला आघाडीच्या उषा राऊत आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.