स्थैर्य, फलटण, दि.२१: जिल्हाधिकारी सातारा यांनी दि.18 जून 2021 रोजी दिलेल्या आदेशास अनुसरुन आणि फलटण तालुका अडत व भुसार व्यापारी असोसिएशन यांचेशी झालेली चर्चा विचारात घेऊन फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीने भुसार मार्केट पूर्ववत, कांदा मार्केट, शेळी मेंढी बाजार व जनावरे बाजारचे नियोजन केले असल्याचे बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
नव्याने करण्यात आलेल्या नियोजनानुसार बुधवार दि.23 जून 2021 रोजी भुसार आवक उतरवून घेतली जाईल आणि गुरुवार दि.24 जून 2021 रोजी भुसार लिलाव होतील.
रविवार दि.27 जून 2021 पासून भुसार मार्केट नियमितपणे दर रविवारी सुरु राहील.
दर मंगळवारी नियमितपणे कांदा मार्केट होईल.
शेळी मेंढी,जनावरे व वैरण बाजार दर रविवारी नियमितपणे होईल.
सोमवार वगळता सर्व दिवशी फळे व भाजीपाला मार्केट नियमितपणे सुरु आहे.
याची नोंद सर्व शेतकरी बंधू, अडते, खरेदीदार, हमाल व मापाडी, वाहतूकदार आणि इतर घटकांनी घ्यावी. तसेच बाजार समितीच्या आवारात मास्क, सोशल डिस्टनसिंग, सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन बाजार समितीचे सचिव शंकर सोनवलकर यांनी केले आहे.