मेहेर कॉलनीत प्रस्तावित उद्यानाचे खासदार उदयनराजे यांच्या हस्ते भूमीपूजनं

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २३ सप्टेंबर २०२१ । सातारा । सातारा शहराचे उपनगर असणाऱ्या करंजे परिसरात मेहेर कॉलनीत प्रस्तावित बागेच्या कामाचा एकीकडे नारळ फुटला तर दुसरीकडे सय्यद कॉलनी येथील महिलांनी पाण्यासाठी रास्ता रोको केल्याने येथील वाहतुकीचा अर्धा तास खोळंबा झाला . शहराच्या एकाच भागात विकास कामांचा धडाका आणि नागरिकांची होणारी असुविधा यांचे परस्पर विरोधी चित्र पहायला मिळाले .

सातारा नगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेउन आता खासदार उदयनराजे भोसले यांची विकासकामांच्या माध्यमातून राजकीय बांधणी सुरू झाली आहे . करंजे भागातील सर्वे नं 413 येथे नगरोत्थान योजनेअंर्तगत दीड कोटी रुपये खर्च करून प्रशस्त उद्यान क्षेत्र विकसित करण्यात येणार आहे . या कामाचे भूमीपूजन खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले . याशिवाय पोवई नाक्यावरील शिवस्मारकाच्या कामाची पाहणी करून येथील रस्त्याच्या कामाचे सुध्दा त्यांनी भूमीपूजन केले . या दोन्ही कार्यक्रमास नगराध्यक्ष माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, किशोर शिंदे, अॅड दत्ता बनकर, पाणी पुरवठा सभापती सीता हादगे, आरोग्य सभापती अनिता घोरपडे उपस्थित होते . नागरिकांना मुलभूत सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे . करंजे भाग आणि हद्दवाढीचा नवीन भाग येथे कोणत्याही सुविधा आणि त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही खासदार उदयनराजे यांनी देत उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्या कामाच्या झपाट्याचे कौतुक केले .

करंजेत विकास कामांचे नारळ फुटल्यावर काही वेळातच सय्यद कॉलनी करंजे नाका येथे महिलांनी पाण्याची भांडी मांडून रास्ता रोको केला . या भागाला तालुका पोलीस स्टेशन परिसरातील टाकीवरून पाणी पुरवठा होतो मात्र पाणी प्राधिकरणामार्फत दिले जाते . या भागातील जलवाहिन्या बंद झाल्याने या परिसराला कमी दाबाने पाणी येते . सय्यद कॉलनीच्या पंधरा ते वीस महिलांनी रास्ता रोको करून आपला राग व्यक्त केला . उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, नगरसेविका लता पवार, पाणी पुरवठा सभापती सीता हादगे यांनी घटनास्थळी येऊन महिलांची समजूत घातली . दसरा दिवाळी तोंडावर असताना होणाऱ्या पाणीटंचाईचा त्रागा महिलांनी व्यक्त केला .पाणी पुरवठा विभागाने तत्काळ या भागाची मुख्य सहा इंची लाईन खोदण्याचे काम हाती घेतले . पा भागाला टॅंकरने पाणी देण्याची पर्यायी सोय करण्यात आली . यापुढे मुबलक पाणी पुरवठा करण्यात येइल असे आश्वासन देण्यात आले . या गोंधळ नाट्यात सुमारे अर्धा तास वाहतूक खोळंबली होती.


Back to top button
Don`t copy text!