भुईंजच्या सायकलवेड्यांची मोहीम फत्ते

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, भुईंज, दि.२८: भुईंज ते मुरुडेश्वर हे साडेपाचशे कि. मी. चे अंतर २६ तास १९ मिनिटांत पूर्ण करत भुईंज येथील सायकल वेडे क्लबच्या सदस्यांनी आपली मोहीम यशस्वीपणे फत्ते केली. त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
      फेब्रुवारी २०२० च्या यशस्वी  गोवा सायकल मोहिमेमुळे वाढलेला आत्मविश्वास आणि अनुभवाच्या जोरावर सायकलवेड्यांनी एक वर्षाच्या आत मुरुडेश्वर ( कर्नाटक )  मोहीम यशस्वी केली.
     योगेश शिर्के आणि संतोष ननावरे यांनी मोहिमेची संपुर्ण जबाबदारी पार पाडली. डाॅ सोनावणे आणि  डाॅ. पंचपोर यांनी प्रवासादरम्यान आहार अ‍ाणि तंदुरुस्त रहाण्यासाठी मोैलिक सुचना केल्या. उद्योजक अंकुश शिंदे आणि प्रसन्न मेडीकलचे राहुल पवार यांनीही मोलाची मदत केली. सर्व सदस्यांचे कुटूंबिय , मित्रवर्ग , हितचिंतक यांचा पाठींबा मोलाचा ठरला.
  सुमारे ५५० कि. मी. चा हा प्रवास २६ तास १९ मिनिटात जिद्द , चिकाटी आणि प्रचंड आत्मविश्वासच्या बळावर पूर्ण केला.
    निरोगी शरीर , सशक्त मन  आणि तणावमुक्त जीवनासाठी रात्रीचे मित्र सोडा आणि पहाटेचे मित्र जोडा, हा संदेश घेऊन  योगेश शिर्के , संतोष ननावरे, गौरव जाधवराव , घनशाम जाधवराव , अमेय पवार ,निलेश दगडे , ओंकार ठोके, प्रवीण ठोके, सागर दळवी, मंगेश दळवी यांनी ही या मोहिमेत भाग घेतला.
   गुरुवारी पहाटे ४ वाजता उपसरपंच प्रशांत जाधवराव व उद्योजक विजयसिंह तथा पिंटूकाका जाधवराव यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ झाला. पहिल्याच दिवशी २६० कि. मी. अंतर पार करीत बेळगाव येथे सर्वांनी पहिला मुक्काम केला. तेथे  विजय पाटील व त्यांच्या मित्रपरिवाराने सर्व सोय अतिशय ऊत्तम केली. दुसऱ्या दिवशी बेळगाव ते येल्लापुर  हा घनदाट जंगल आणि घाटरस्ता सर्वांनी पार केला. हा मार्ग थरारक अनुभव देणारा ठरला.
   येल्लूर ते मुरुडेश्वर हे १३२ कि. मी.चे अंतर पार करण्यासाठी शनिवारी पहाटे ४  वाजताच सगळे जोश आणि ऊमेदीने सज्ज झाले आणि अतिशय नेटाने आणि शिस्तबद्घ रित्या मुरुडेश्वर मोहीम फत्ते केली.
 प्रवीण व ओंकार ठोके या पितापुत्रांचा तर सागर व मंगेश दळवी या भावांचा यात सहभाग होता. विशेष म्हणजे मोहीम प्रमुख संतोष उर्फ दादासाहेब ननावरे यांचा उज‍वा पाय दुखावला असूनही त्यांनी ही मोहीम फत्ते केली.
  दररोज सुमारे ४०  कि. मी. सायकल यात्रा करणाऱ्या या सायकल वेड्यांनी ही मोहीम तीन दिवसात २६ तास २९ मिनिटे सायकल चालवत आणि आरोग्यदायी जीवनाचा संदेश देत पूर्ण केली. सायकल बाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती व संपूर्ण परिसरात आवड निर्माण करणाऱ्या या सायकल वेड्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Back to top button
Don`t copy text!