स्थैर्य, ढेबेवाडी, दि.३: प्रतिवर्षी पावसाळ्यानंतर आबालवृद्धांना भुरळ घालणारी भोसगाव (ता. पाटण) येथील वनविभागाच्या निसर्ग पर्यटन केंद्रातील फुलपाखरांची रंगीबेरंगी दुनिया यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुलूपबंद असल्याने बालगोपाळ, पर्यटक व अभ्यासकांना चुकल्या-चुकल्यासारखे वाटत आहे.
निसर्ग सौंदर्याने समृद्ध ढेबेवाडी खोऱ्यातील भोसगावजवळच्या डोंगरात वनविभागाने सहा वर्षांपूर्वी निसर्ग पर्यटन केंद्र व फुलपाखरू उद्यान विकसित केले आहे. विविध जिल्ह्यांतून शालेय विद्यार्थ्यांच्या सहलींबरोबर पर्यटक व अभ्यासकांचा तिथे नियमित ओघ असतो. पश्चिम घाटात आढळणारी फुलपाखरे पाहण्याची आणि अभ्यासण्याची संधी त्याद्वारे पर्यटक आणि अभ्यासकांना उपलब्ध झाली आहे. माहिती केंद्रासह ब्रिटिशकालीन वनविश्रामगृह, खानसमा निवास व भोजनकक्ष असा ऐतिहासिक ठेवाही येथे पाहण्यास उपलब्ध आहे. विविध प्राणी व पक्ष्यांचे पुतळे बालगोपालांचे विशेष आकर्षण ठरत असून, निसर्ग केंद्रातील पायऱ्या चढून उंच टेकडीवर गेल्यावर पॅगोडातून मराठवाडी धरणासह देखणा निसर्गही पाहाता येतो. प्रतिवर्षी ऑक्टोबरपासून डिसेंबरपर्यंत येथील फुलपाखरांची दुनिया बहरते. पावसाळ्याच्या तोंडावर वनविभागामार्फत फुलपाखरांना आकर्षित करणारी फुलझाडे व विविध प्रकारची रोपे लावण्यात येतात.
वनक्षेत्रपाल विलासराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुभाष राऊत, वनकर्मचारी राजन सातपुते, अजय कुंभार व त्यांचे सहकारी, तसेच भोसगावची वनसमिती केंद्राची देखभाल करत आहेत. सध्या तेथे फुलपाखरांची रंगीबेरंगी दुनिया बहरली असली, तरी प्रवेश बंदीमुळे बालगोपाळ, पर्यटक व अभ्यासकांना चुकल्या-चुकल्यासारखे वाटत आहे. पर्यटन केंद्र बंद असल्याने अनेक जण येथे येऊन माघारी जात आहेत, अनेक जण वनविभागाच्या कर्मचाऱ्यांशी मोबाईलवर संपर्क साधत पर्यटन केंद्र पूर्ववत सुरू झालंय की नाही…? याबाबत माहिती घेत आहेत.