कानाडवाडीतील आगीच्या दुर्घटनेत भोसले कुटुंब उघड्यावर; ‘यंग एन्टरप्रेन्युअर्स असोसिएशन’ने दिला मदतीचा हात


दैनिक स्थैर्य । दि. 02 ऑगस्ट 2025 । बारामती । बारामती तालुक्यातील कानाडवाडी (चोपडज) येथील शंकर रामभाऊ भोसले यांचे घर विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत पूर्णपणे भस्मसात झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या आगीत घरातील कपडे, भांडी, फ्रीज, कपाट यांसारख्या संसारोपयोगी साहित्यासह महत्त्वाची शैक्षणिक कागदपत्रे जळून खाक झाल्याने भोसले कुटुंब उघड्यावर आले आहे.

या संकटसमयी बारामती येथील ‘यंग एन्टरप्रेन्युअर्स असोसिएशन’ या सामाजिक संस्थेने तातडीने धाव घेत भोसले कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन भोसले कुटुंबाला तातडीने जीवनावश्यक वस्तूंची मदत केली. यावेळी संघटनेचे सार्थक शहा, चिराग शहा, अजिंक्य गांधी, वृषाल भोसले आदी उपस्थित होते.

या सामाजिक कार्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने संजीवकुमार भोसले, योगेंद्र भोसले आणि पांडुरंग कोळेकर यांनी असोसिएशनच्या सदस्यांचे आभार मानले व त्यांच्या उपक्रमाचे स्वागत केले. या मदतीमुळे भोसले कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे.


Back to top button
Don`t copy text!