
दैनिक स्थैर्य | दि. १७ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
मुधोजी महाविद्यालय फलटण येथे इंग्लिश विभागामध्ये प्राध्यापक या पदावर प्रदीर्घ काळ सेवा केलेले, संस्कृतचे गाढे अभ्यासक काव्यतीर्थ कै. मुकूंद श्रीधर आळतेकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ मुधोजी महाविद्यालय प्रांगणामध्ये सर्व अत्याधुनिक सुविधांयुक्त ‘काव्यतीर्थ मुकुंद श्रीधर आळतेकर स्मृतिभवन’ या सांस्कृतिक सभागृहाचे भूमिपूजन बुधवार, दि. १४ फेब्रुवारी रोजी फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
प्रा. आळतेकर यांनी आपली संपूर्ण कारकीर्द मुधोजी महाविद्यालयाच्या सेवेत घालवली. त्यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले. आपल्या दिवंगत पतीच्या कर्मभूमीमध्ये त्यांची चिरंतन स्मृती राहावी, या उद्देशाने श्रीमती अनुराधा मुकुंद आळतेकर यांनी एक स्मृतिभवन उभारण्याचे ठरवले. याबाबत त्यांनी फलटण एज्युकेशन सोसायटीस आपला विचार बोलून दाखवला. या स्मृतिभवनाच्या उभारणीसाठी त्यांनी उदार अंतःकरणाने देणगी जाहीर केली आहे.
फलटण एज्युकेशन सोसायटी गव्हर्निंग कौन्सिल यांनी श्रीमती आळतेकर यांच्या या भावनेचा आदर करत मुधोजी महाविद्यालयाच्या प्रांगणात सर्व सुविधा व अद्यावत तंत्रज्ञानयुक्त ऑडिटोरियम अशा सभागृहाची उभारणी करण्याचे ठरवले.
यावेळी बोलताना श्रीमंत संजीवराजे यांनी या स्मृतिभवनच्या रूपाने प्रा. आळतेकर सरांच्या स्मृती चिरंतर राहतील, असा विश्वास व्यक्त करून या स्मृतिभवनामुळे कॉलेजबरोबरच फलटणमध्ये होणार्या शैक्षणिक, सांस्कृतिक व संगीत विषयक कार्यक्रमांना जागा उपलब्ध होईल. या सभागृहामध्ये भव्य रंगमंच, ५०० आसन क्षमतायुक्त प्रेक्षागृह, कलावंत, मान्यवर यांच्यासाठी सर्व सुखसोयींनियुक्त खोल्या, प्रशस्त पार्किंग, प्रवेशद्वारासमोर श्रीमंत मालोजीराजे यांचा भव्य पुतळा अशा सर्व सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. हे सभागृह फलटणच्या नाईक निंबाळकर राजघराण्याने यापूर्वी बांधलेल्या मुधोजी मनमोहन राजवाडा, फलटण नगरपरिषद, अधिकारगृह यासारख्या ऐतिहासिक इमारतींची रचना लक्षात घेऊन बांधले जाणार आहे. स्मृतिभवनाची ही वास्तू फलटणच्या शैक्षणिक व सांस्कृतिक वैभवामध्ये नक्की भर घालेल, असा विश्वासही श्रीमंत संजीवराजे यांनी यावेळी व्यक्त करून आळतेकर कुटुंबियांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमास श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, श्रीमती अनुराधा मुकुंद आळतेकर, डॉ. मेघना बर्वे, डॉ. प्राची बर्वे, फलटण एजुकेशन सोसायटीचे ट्रेझरर श्री. हेमंत रानडे, गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य श्री. शिवाजीराव घोरपडे, श्री. शिरीष भोसले, श्री. चंद्रकांत पाटील, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्री. आशिष गडकरी व त्यांच्या सुविद्य पत्नी, प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम, मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य श्री. गंगावणे, श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूलचे माजी प्राचार्य पी. एम. काळे, मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम, कराड अर्बन बँकेचे विभागीय व्यवस्थापक श्री. पोरे साहेब, फलटण शाखा व्यवस्थापक श्री. भोसले साहेब, मुधोजी महाविद्यालय विकास समिती सदस्य, प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.
प्रास्ताविक प्रा. डॉ. अशोक शिंदे यांनी केले तर प्रा. पी. एम. काळे यांनी कै. प्रा. आळतेकर सरांच्या काही आठवणी सांगून त्यांच्या स्मृतीला अभिवादन केले. फलटण एज्युकेशन सोसायटीच्या वतीने या देणगीबाबत श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते श्रीमती अनुराधा आळतेकर यांचा सत्कार करण्यात आला.