
दैनिक स्थैर्य । दि.०३ फेब्रुवारी २०२२ । फलटण । माझेरी प्रा. शाळेची गुणवत्ता जिल्ह्यात अग्रेसर आहे, समाजोपयोगी उपक्रमातही माझेरी शाळा अव्वल ठरत असून भोलचंद बरकडे सरांची चिकाटी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन उपविभागीय कृषी अधिकारी भास्करराव कोळेकर यांनी केले.
जिल्हा परिषद माॅडेल स्कूल माझेरी (पुनर्वसन) व ग्रामपंचायत माझेरी यांच्यावतीने स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षात व राष्ट्रमाता जिजाऊ ते क्रांतिज्योती सावित्री सन्मान अभियानांतर्गत माझेरी प्रा. शाळेत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोळेकर बोलत होते. यावेळी फलटणचे वनक्षेत्रपाल दिगंंबर जाधव, माजी सरपंच ज्ञानेश्वर दिघे, दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश दिघे उपस्थित होते.
कोरोना काळात रक्ताचा असलेला तुटवडा पाहून शाळेने एक राष्ट्रीय कार्य म्हणून रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. ही बाब निश्चितच गौरवास्पद असल्याचे कोळेकर यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषद प्रा.शाळेने ग्रामपंचायतीच्या सहकार्याने राबविलेला उपक्रम इतरांसाठी दिशादर्शक असल्याचे वनक्षेत्रपाल दिगंबर जाधव यांनी निदर्शनास आणले. शाळा व्यवस्थापनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत पालक व ग्रामस्थांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला असून १०२ रक्तदात्यांनी रक्तदान करीत सामाजिक बांधिलकी जपली. रक्तदान शिबीराचे उदघाटन कमिन्स कंपनीचे व्यवस्थापक प्रविण गायकवाड यांच्या हस्ते झाले, तर प्रमुख पाहुणे म्हणून कमिन्सचे विक्रमसिंह धुमाळ, शिक्षणविस्तार अधिकारी चनय्या मठपती, केंद्रप्रमुख सुनंदा बागडे उपस्थित होते. जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, पंचायात समिती फलटणच्या गटविकास अधिकारी सौ. अमिता गावडे पवार, गटशिक्षणाधिकारी अनिल संकपाळ, प्रा. शिक्षक बँक संचालक अनिल शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शाळा व ग्रामपंचायत माझेरी यांनी राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. रक्तदान शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत माझेरी सरपंच सौ.मनिषा दिघे, माजी सरपंच ज्ञानेश्वर दिघे, प्रविण दिघे, दत्ता पवार, अर्जून दिघे, शंकर दिघे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश दिघे, उपाध्यक्ष मिनाक्षी कोरडे, मुख्याध्यापक गणेश पोमणे, अशोक मिसाळ, भोलचंद बरकडे, भगत सर, सर्व शिक्षक, रक्तवीर संघटनेचे आशिष काटे, ऋषिकेश बिचुकले, ब्लडबँकेचे डाॅ. उपाध्ये तसेच व्यवस्थापन समिती, पालक व गावातील तरुण कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.