दैनिक स्थैर्य । दि. १९ सप्टेंबर २०२१ । शिखर शिंगणापूर । शिखर शिंगणापूर, ता. माण या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी सामाजिक वनीकरण कार्यक्रम मनमानीपणे राबवून शासनाच्या निधीचा चुराडा केला आहे. या कामात मोठा घोटाळा असून याबाबतची माहिती विचारल्यास अधिकारी टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे याप्रकरणी सखोल चौकशी करावी, अन्यथा दि. 20 पासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणााला बसणार असल्याचा इशारा शिंगणापूर येथील निखिल कुंभार यांनी दिला आहे.
याबाबत त्यांनी सर्व प्रशासकीय कार्यालयांना निवेदन पाठवले आहे. यामध्ये म्हटले आहे की, शिखर शिंगणापूर, ता. माण या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी शासनाकडून सामाजिक वनीकरण ही संकल्पना राबवण्यात येऊन एक पर्यटन स्थळ विकसित होण्यासाठी 33,333 वृक्ष लागवड कार्यक्रम राबवण्यात आला होता. ही वृक्ष लागवड शासनाने दिलेल्या निविदाप्रमाणे व मजुरांमार्फत करायची होती. तसे न करता यांत्रिकी मशिनद्वारे जे. सी. बी. खड्डे काढण्यात आले होते. या कामाचे मंजूर मस्टर दाखवून मजुरांच्या नावाने बिले काढण्यात आली आहेत. निविदांप्रमाणे खड्ड्याची लांबी रूंदी उंची सह अंतर न घेता वृक्षलागवड करण्यात आलेली आहे.
तसेच गायरान क्षेत्रात वृक्षलागवड करताना संबंधित विभागाची परवानगी घेऊन काम झाले पाहिजे होते. सामाजिक वनीकरण विभागाने आपल्या मनमानी कारभार करून नियमबाह्य वृक्षलागवड केलेली आहे. या सर्व बाबीचा विचार करून निखील कुंभार यांनी सामाजिक वनीकरण दहिवडी कार्यालयाकडे माहितीच्या अधिकार याद्वारे माहिती अर्ज केला. त्या अर्जानुसार सर्व माहिती देण्यास सामाजिक वनीकरण कार्यालयाचे अधिकारी देण्यास टाळाटाळ करण्यात आली.
सामाजिक वनीकरण कार्यालयाचा मनमानी कारभाराविषयक त्रयस्थ पक्षकरामार्फत सखोल चौकशी दि. 19 पर्यंत करण्यात यावी. अन्यथा, दि. 20 पासून जिल्हाधिकारी कार्यालय सातारा याठिकाणी बेमुदत उपोषणाचा इशारा शिंगणापूरमधील निखील कुंभार यांनी सर्व प्रशासकीय कार्यालयाशी पञव्यवहार करून दिलेला आहे.