
स्थैर्य, फलटण, दि. ७ ऑक्टोबर : फलटण शहरातील सार्वजनिक स्मशानभूमीला पुणे रस्त्याकडून पर्यायी प्रवेशद्वार करण्याच्या मागणीकडे मुख्याधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ, भीम आर्मी संघटनेच्या वतीने आज नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारासमोर ‘अंत्यविधी आंदोलन’ करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास दि. २० ऑक्टोबर रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.
फलटण शहरातील स्मशानभूमी अपुरी पडत असून, अंत्यविधीसाठी अनेक अडथळे येत आहेत. ही गैरसोय टाळण्यासाठी पुणे रस्त्याच्या बाजूने एक पर्यायी प्रवेशद्वार करण्यात यावे, अशी मागणी भीम आर्मीने यापूर्वी निवेदनाद्वारे केली होती. मात्र, मुख्याधिकाऱ्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत संघटनेने हे आंदोलन केले.
आंदोलकांच्या प्रमुख मागण्या:
- स्मशानभूमीला पुणे रस्त्याकडून पर्यायी प्रवेशद्वार करावे.
- स्मशानभूमीच्या दोन्ही बाजूंना वाहनांसाठी पार्किंगची सोय करावी.
- आत आणि बाहेर अतिरिक्त पथदिवे बसवून प्रकाश व्यवस्था करावी.
- स्मशानभूमीच्या परिसरात वृक्ष लागवड करावी.
या मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असे संघटनेने म्हटले आहे. या आंदोलनात अजित संभाजी मोरे, लक्ष्मण काकडे, सुनील पवार, आदेश कांबळे, विजय कांबळे, कुणाल अहिवळे, सनी पवार, भाग्यश्री कांबळे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.