
स्थैर्य, फलटण, दि. २४ सप्टेंबर : फलटण शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्या पाहता सार्वजनिक स्मशानभूमी अपुरी पडत असून, मंगळवार पेठेतील एकमेव अरुंद रस्त्यामुळे अंत्यविधीसाठी मोठी गैरसोय होत आहे. या समस्येवर तोडगा म्हणून स्मशानभूमीच्या मागील बाजूने म्हणजेच पुणे रस्त्याकडे जाणारा एक पर्यायी प्रवेशद्वार तयार करावा, अशी मागणी भीम आर्मी संघटनेने फलटण नगरपरिषदेकडे केली आहे. या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.
भीम आर्मीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्मशानभूमीकडे जाण्यासाठी सध्या मंगळवार पेठेतून एकमेव रस्ता आहे. हा भाग दाट लोकवस्तीचा असल्याने येथे अनेक घरगुती कार्यक्रम, सण-उत्सव आणि जयंती मिरवणुका सतत सुरू असतात. अशा वेळी अंत्ययात्रा घेऊन जाणाऱ्या नागरिकांना मोठी कसरत करावी लागते आणि वाहतुकीचे अडथळे निर्माण होतात. तसेच, पार्किंगची मोठी समस्याही निर्माण होते.
ही गैरसोय टाळण्यासाठी स्मशानभूमीला पुणे रस्त्याच्या बाजूने एक पर्यायी प्रवेशद्वार तयार केल्यास वाहतूक विभागली जाऊन नागरिकांना दिलासा मिळेल. नगरपरिषदेने या कामाला तातडीने मंजुरी देऊन ते लवकरात लवकर पूर्ण करावे, अन्यथा येत्या ७ ऑक्टोबर रोजी फलटण नगरपरिषदेसमोर प्रतिकात्मक अंत्यविधी आंदोलन केले जाईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.
हे निवेदन देतेवेळी भीम आर्मी संघटनेचे अजित संभाजी मोरे, लक्ष्मण काकडे, सुनील पवार, आदेश कांबळे, विजय कांबळे, कुणाल अहिवळे आणि सनी पवार उपस्थित होते.

