
स्थैर्य, फलटण, दि. १५ ऑगस्ट : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे योजनेअंतर्गत मंजूर झालेला निधी खाजगी ठिकाणी आणि इतर कामांसाठी वापरून शासनाची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप भीम आर्मी संघटनेने केला आहे. याप्रकरणी फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि बांधकाम अभियंता यांच्यावर कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली होती, ज्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.
भीम आर्मीच्या निवेदनानुसार, मंगळवार पेठेतील मटण मार्केट परिसर रस्ता आणि सोमवार पेठेतील एका खाजगी रस्त्याच्या कामासाठी दलित वस्ती सुधार योजनेचा निधी नियमबाह्यपणे वापरण्यात आला आहे. एकूण मंजूर निधीपैकी मोठी रक्कम या कामांवर खर्च करून शासनाची फसवणूक करण्यात आली आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
या प्रकरणातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आणि कामात पारदर्शकता आणण्यासाठी आपण सर्व पुरावे सादर करणार आहोत. समाजाला घातक असणाऱ्यांना गजाआड केल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा भीम आर्मी संघटनेने दिला आहे.