दैनिक स्थैर्य । दि. २६ फेब्रुवारी २०२२ । सातारा । रघुपती राघव राजाराम :पतीत पावन सीताराम !व प्रभू श्री रामाचा जयघोषात 340 वा दासनवमी महोत्सव महंत मठपती व समर्थ भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सज्जनगड राम नामाच्या जयघोषाने दुमदुमला होता.
शुक्रवारी पहाटे 2 वाजता समाधी मंदीरात काकड आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. काकड आरती समाधी पुजा या नंतर समर्थ वंशज यांच्या उपस्थितीत सज्जनगडावर सांप्रदायिक भिक्षा फेरी काढण्यात आली. पहाटे 6 वाजता समाधी मंदीर पेठेतील मारुती मंदीर,व सज्जनगड गावात भिक्षा अर्पण करण्यासाठी भावीक उपस्थित होते. 10.30 वाजता चांदीच्या सजवलेल्या पालखीतून प्रभु श्री रामाच्या मूर्ती ची मानकरी, मठपती यांच्या उपस्थितीत छबीना काढण्यात आला. यावेळी मानाच्या काठी पालख्या, दिवटय़ा, शिंग तुतारी, हलगीच्या वाद्यात परिसर भक्तिमय झाला होता. प्रभु श्री राम मंदीर ते पेठेतील मारुती मंदीर श्रीधरकुटी असा छबीना काढण्यात आला. यानंतर समाधी मंदीरास मानाच्या 13 प्रदक्षिणा घालण्यात आल्या. यावेळी समर्थ वंशज अभिराम स्वामी. सु. ग. स्वामी, कौस्तुभबुवा रामदासी, अभ्यंकरबुवा रामदासी, सोन्नाबुवा रामदासी, रसीकाताई ताम्हणकर, मकरंद बुवा रामदासी आदी मान्यवर उपस्थित होते.
सोन्ना बुवा रामदासी यांनी समर्थांची निर्यान कथा सांगत असताना भाविक गहिवरे होते. समर्थसेवा मंडळाच्या वतीने श्रीधरकुटी व भक्तनिवास येथे अध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गडावर कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ग्रामपंचायत परळीने भाविकांना सोईसुवीधा उपलब्ध करुन दिल्या होत्या. गडावर व्यावसायिकांनी दुकाने थाटली होती.