कोकणात फळबागा मोठ्या प्रमाणात आहेत. विशेषतः काजू, आंबा, चिकू, नारळ, कोकम, चिंच, आवळा या फळबागांसाठी शेतकऱ्यांना मदत व्हावी, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरिता पात्र ठरू शकत नाहीत, अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने राज्यात सन 2018-19 च्या खरीप हंगामापासून स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही राज्य पुरस्कृत योजना सुरू केली.
या योजनेच्या माध्यमातून पिक व पशुधन याबरोबरच फळबागेच्या रूपाने शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. या योजनेअंतर्गत कोकण विभागात 10 हेक्टर क्षेत्रापर्यंत लागवड करण्यास मान्यता आहे. मग्रारोहयो फळबाग लागवड योजनेत लाभ न घेऊ शकणाऱ्या व 2 हेक्टर क्षेत्रापेक्षा अधिक फळबाग लागवड (कमाल 10 हेक्टर) करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
Ø योजनेचे मुख्य उदिष्ट :
- पिक व पशुधन याबरोबर फळबागेच्या रुपाने शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादनाचा स्त्रोत उपलब्ध करून देणे.
- मग्रारोहयो अंतर्गत लागवडीचा लाभ देणेस अपात्र असणाऱ्या शेतकऱ्यास लाभ देणेसाठी.
Ø लागवडीसाठी अनुज्ञेय फळपिके :
- कलमे– आंबा, काजू, पेरु, सिताफळ, आवळा, चिंच, जांभुळ, कोकम, फणस, चिकू, कागदी लिंबू.
- रोपे– नारळ बाणावली, टि/डी
Ø क्षेत्र मर्यादा :- कोकणाकरीता कमाल 10 हेक्टर उर्वरित महाराष्ट्र 6 हेक्टर (रोहयो / मग्रारोहयो अंतर्गत यापूर्वी लाभ घेतलेल्या क्षेत्रासह)
Ø लाभार्थी निकष :-
- वैयक्तिक शेतकरी
- मग्रारोहयो अंतर्गत लागवडीचा लाभ देणेस अपात्र असणाऱ्या शेतकऱ्यास लाभ देणे.
- स्वत:च्या नावे7/12 व संयुक्त खातेदार असल्यास संमतीपत्र आवश्यक
- कुळाच्या नावे असल्यास कुळाचे संमतीपत्र आवश्यक
- परंपरागतवन निवासी अधिनियम 2006 नुसार वनपट्टेधारक शेतकरी
- किमान10 गुंठे जमीन आवश्यक
- अल्प/अत्यल्प,महिला, दिव्यांग शेतकरी यांना प्राधान्य
Ø समाविष्ट बाबी :-
अ.क्र | शेतकऱ्याने स्वखर्चाने | शासन अनुदानीत |
1 | जमीन तयार करणे | खड्डे खोदणे |
2 | माती व शेणखत / सेंद्रिय खत मिश्रणाने खड्डे भरणे | कलमे लागवड करणे (नारळाच्या बाबतीत रोपे) |
3 | रासायनिक खत वापरून खड्डे भरणे | पीक संरक्षण |
4 | आंतर मशागत करणे | नांग्या भरणे |
5 | काटेरी झाडांचे कुंपण (ऐच्छिक) | ठिंबक सिंचनाद्वारे पाणी देणे |
* ठिंबक सिंचन संच उभारणीकरीता 100 टक्के अनुदान. केंद्र पुरस्कृत ठिंबक सिंचन योजनेतून अनुज्ञेय असणारे अनुदान प्रथमत: अदा करून उर्वरीत अनुदान या योजनेतून देय.
Ø अंतर्गत अर्थसहाय्य :
- अनुदानाचे वाटप50:30:20 याप्रमाणे 3 वर्षात फळांच्या जिवंत टक्केवारीनुसार देय. प्रथम वर्ष 80 टक्के, दुसरे वर्ष 90 टक्के झाडे जिवंत असावीत.
- आवश्यक कलमे/रोपे शासकिय/ कृषी विद्यापीठाच्या रोपवाटीकेतून परमिटद्वारे घेतल्यास कलम/रोपाचे अनुदान थेट रोपवाटीकांस बँकेद्वारे वर्ग करावे.
- उर्वरीत अनुदान शेतकऱ्याच्या आधारसंलग्न बँक खात्यावर वर्ग करावे.
आर्थिक मापदंड :-
आंबा, काजू, पेरु, कागदी लिंबू, सिताफळ, आवळा, चिंच, जांभूळ, कोकम, फणस, चिकू, नारळ या फळपिकांच्या कलमे व रोपांसाठी आर्थिक सहाय्य केले जाते.
Ø अर्ज करावयाची कार्यपध्दती :
- स्थानिक वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रसिध्द करुन शेतकऱ्यांचे अर्ज मागविण्यात यावे.
- जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून पुढील २१ दिवसाचे आत अर्ज स्विकारण्यात यावेत.
- जास्त प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्यास सोडत पद्धतीने निवड करण्यात यावी व निवड केलेल्या लागवडीबाबतत्वरित पूर्वसंमती देण्यात यावी.
- स्व.भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या लाभासाठीhttp://mahadbt.gov.in या संकेतस्थळावरुन शेतकरी योजना पर्याय निवडून ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील. तसेच ठिबक सिंचनाच्या लाभासाठी त्याच संकेतस्थळावर वेगळा अर्ज करावा.
Ø सादर करावयाची कागदपत्रे :-
- विहीत नमुन्यातील अर्ज
- 7/12व 8-अ उतारा
- करार पत्रक प्रपत्र/हमीपत्र
- संयुक्त खातेदार असल्यास सर्व खातेदारांचे संमतीपत्र परिशिष्ट -१
- आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँक पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत(फोटोसहीत)
- आधार कार्ड छायांकित प्रत
- जातीचा दाखला(अनु.जाती/अनु.जमाती शेतकऱ्यांसाठी)
Ø कलमे रोपांची निवड लाभार्थीने स्वत: करावयाची आहे. त्यासाठी कलमे / रोपे खरेदी करताना रोपवाटिकांचा प्राधान्यक्रम असा राहील :–
- कृषी विभागाच्या रोपवाटिका
- कृषी विद्यापिठांच्या रोपवाटिका
- राष्ट्रीय बागवानी मंडळामार्फत मानांकित पंजीकृत खाजगी रोपवाटिका
- परवानाधारक खाजगी रोपवाटिका
Ø योजनेंतर्गत इतर तरतुदी :
1) फळबाग लागवडीचा कालावधी माहे जून ते मार्च अखेरपर्यंत राहील.
2) कोकण विभागास 10 हे. क्षेत्रापर्यंत लागवड करण्यास मान्यता असून ठिंबक सिंचन या घटकास 100 टक्के अनुदान देय करण्यात आले आहे. त्यामुळे 5 हेक्टर क्षेत्रापर्यंतच्या लाभार्थीस प्रथमतः प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून अनुज्ञेय अनुदान देय करण्यात यावे व उर्वरीत अनुदान भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून देण्यास मान्यता.
3) मग्रारोहयो अंतर्गत सन 2010 पासून पुढे लागवड केलेल्या फळबाग लागवडीचे क्षेत्र वगळून लाभार्थ्यास उर्वरीत अनुज्ञेय क्षेत्रापर्यंत (एकूण 10 हे.) या योजनेमध्ये लाभ देण्यास मान्यता.
4) 1 हेक्टर पेक्षा कमी व त्यापेक्षा जास्त क्षेत्राकरिता लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रधान मंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत 0.40 ते 5 हेक्टर क्षेत्राकरिता ठिंबक सिंचनाच्या मंजूर मापदंड प्रमाणे अनुदान देण्यास मान्यता.
5) कोकण विभागातील ज्या शेतकऱ्यांना ठिंबक सिंचनाचा वापर करणे शक्य आहे. अशा शेतकऱ्यांना ठिंबक सिंचनाचा लाभ देण्यात यावा. तसेच ज्या शेतकऱ्यांना ठिंबक सिंचन संच बसविणे शक्य नाही. परंतु योजनेतील इतर घटकाचा लाभ घेवू इच्छितात अशा शेतकऱ्यांना शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या झाडे जगवण्याच्या अटीवर अन्य घटकांचा लाभ देण्यास मान्यता.
6) कोकण विभागातील ज्या शेतकऱ्यांनी फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ घेण्यापूर्वी त्याच सर्वे नं/ गट नं. करीता ठिंबक सिंचन योजनेचा लाभ घेतला असल्यास व ठिंबक सिंचन संचाचे आयुष्यमान (4 वर्षापर्यंत) शिल्लक असल्यास पुनःच ठिंबक सिंचन संच बसविणे हा घटक न राबविता इतर घटकांचा लाभ देण्यात यावा.
7) लाभार्थ्याने लागवडीच्या पहिल्या वर्षी फळबाग लागवडीची नोंद 7/12 उताऱ्यावर घेतली नसल्यास पहिल्या वर्षीचे 50 टक्के अनुदान देण्यात यावे. तथापि दुसऱ्या व तिसऱ्या वर्षीचे उर्वरीत 50 टक्के अनुदान हे 7/12 उताऱ्यावर फळपिकाची नोंद घेतल्यानंतरच देण्यास मान्यता.
8) योजनेत कोकण विभागासाठी सामाजिक वर्गवारीनुसार खालीलप्रमाणे आर्थिक लक्षांक प्राप्त आहे.
(रक्कम रु. लाख)
अ.क्र. | जिल्हा | सर्वसाधारण | अनुसूचित जाती | अनुसूचित जमाती | एकूण |
1. | ठाणे | 90.10 | 3.79 | 0.45 | 94.34 |
2. | पालघर | 103.37 | 3.85 | 0.52 | 107.74 |
3. | रायगड | 202.24 | 9.19 | 1.01 | 212.44 |
4. | रत्नागिरी | 314.85 | 13.53 | 1.57 | 329.96 |
5. | सिंधुदुर्ग | 180.60 | 8.53 | 0.90 | 190.04 |
एकूण कोकण विभाग | 891.17 | 38.89 | 4.46 | 934.52 |
नंदकुमार ब. वाघमारे,
जिल्हा माहिती अधिकारी,
जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे