कोविड काळात कर्तव्य बजावलेल्या शासकीय कर्मचारी भगिनींसाठीचा भाऊबीज उपक्रम कौतुकास्पद – पालकमंत्री शंभूराज देसाई

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०१ नोव्हेंबर २०२२ । ठाणे । कोविड काळात अहोरात्र कर्तव्य बजावलेल्या आरोग्य, पोलीस व महसूल प्रशासनातील महिला भगिनींचा भाऊबीज देऊन गौरव करण्याचा जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज येथे केले.

जिजाऊ संस्थेच्या वतीने ठाणे शहरातील पोलीस, आरोग्य व महसूल विभागातील महिला कर्मचाऱ्यांचा भाऊबीज कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून श्री. देसाई बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, उपजिल्हाधिकारी अविनाश शिंदे, सहायक पोलीस आयुक्त श्रीमती गावडे, संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे, त्यांच्या आई श्रीमती सांबरे आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले की, गेल्या दोन वर्षापासून कोवीडचा संसर्ग आला होता. त्याकाळात आरोग्य, पोलीस व महसूल विभागातील पुरुष अधिकारी/कर्मचाऱ्यांबरोबर महिला अधिकारी/कर्मचाऱ्यांनी काळ-वेळ न पाहता अहोरात्र सेवा केली. त्यांनी केलेल्या कामांमुळेच कोवीडचा संसर्ग कमी होण्यास मदत झाली. अशा महिला भगिनींना एकत्र आणून त्यांचा भाऊबीज देऊन संस्थेने योग्य गौरव केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपण चांगले काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. कचरा वेचक मुलांसारख्या वंचित घटकांना प्रवाहात आणण्याचे काम जिजाऊ संस्था करत आहे. संस्थेतील अंध अपंग विद्यार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी सहकार्य करू, असेही श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनीही कार्यक्रमास शुभेच्छा देऊन संस्थेच्या कामास जिल्हा प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे सांगितले.

यावेळी श्री. सांबरे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कामाची माहिती दिली. महिला पोलीसांच्या हस्ते पालकमंत्री श्री. देसाई यांना ओवाळले. संस्थेतील अंध मुलामुलींनी यावेळी गीते सादर केली.


Back to top button
Don`t copy text!