भास्कर समूहाच्या वृक्षारोपण मोहिमेचा राज्यपालांच्या हस्ते नागपुरात प्रारंभ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, नागपूर, दि.१३:  पर्यावरणपूरक विकास हाच शाश्वत विकास आहे. निसर्गचक्र अबाधित राखण्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे आहे. त्यासाठी जाणीवेने वृक्षारोपण करणे गरजेचे आहे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

भास्कर वृत्तपत्रसमूहातर्फे सुरु करण्यात आलेल्या वृक्षारोपण मोहिमेचा प्रारंभ आज राज्यपालांच्या हस्ते करण्यात आला. शहरातील अशोकनगर भागात झालेल्या या कार्यक्रमास महापौर दयाशंकर तिवारी, झोन सभापती वंदना भगत, यांच्यासह भास्कर समूहाचे अध्यक्ष मनमोहन अग्रवाल, संचालक सुमित अग्रवाल, समूह संपादक प्रकाश दुबे, संपादक मणिकांत सोनी, कार्यकारी संपादक आनंद निर्बाण उपस्थित होते.

वृक्षारोपणानंतर राज्यपालांनी दै.भास्करच्या कार्यालयास भेट दिली आणि उपस्थितांशी अनौपचारिक संवाद साधला. अनेक वृक्ष लावण्यापेक्षा कमी वृक्ष लावून त्यांचे व्यवस्थित संवर्धन करण्याचा प्रयत्न आपण जाणीवेने केला पाहिजे, असे आवाहन करून ते म्हणाले, सध्या सुरू असलेल्या कोरोना महामारीत ऑक्सिजनचे महत्त्व प्रकर्षाने अधोरेखित झाले आहे. या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनचा नैसर्गिक स्त्रोत असलेल्या वृक्षांचे मातेच्या ममतेने संवर्धन केल्यास वृक्षारोपणाचा खरा हेतू साध्य होईल. वेद-उपनिषदांतही वृक्षांचे महत्त्व नमूद केले आहे. दै. भास्कर समूहाच्या वृक्षारोपण मोहिमेचे कौतुक राज्यपालांनी केले. या मोहिमेच्या प्रगतीचा नियमित आढावा घेण्यासह तिचे सुव्यवस्थित संनियंत्रण होण्याची अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. या मोहिमेत वाचकांनाही सहभागी करून घ्यावे अशी सूचना त्यांनी केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचलन प्रकाश दुबे तर आभार मणिकांत सोनी यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!