दैनिक स्थैर्य । दि. ९ जुलै २०२१ । सातारा । भरधाव टेम्पोने पुढे चाललेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात टेम्पोमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी रात्री बाराच्या सुमारास झाला असून यातील मृत दोघेही उत्तर प्रदेशमधील असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शहबाज नजब खान (वय 23) व इमतियाज खान (वय 25, दोन्ही रा. उत्तर प्रदेश) अशी या अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. याबाबत सातारा तालुका पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, टेम्पो चालक नफीस जुम्मन खान (रा. उत्तर प्रदेश) हा कोल्हापूरहून मुंबईला टेम्पोमधून कोंबड्या घेऊन निघाला होता. त्याच्यासोबत त्याच्या गावातील शहबाज खान आणि इमतियाज खान हे दोघे होते. बुधवारी रात्री बाराच्या सुमारास नफिस खान हा टेम्पो चालवत मुंबईकडे निघाला होता. शेंद्रे, ता. सातारा येथील हॉटेल सातबारा समोर आल्यानंतर पुढे चाललेल्या ट्रकला टेम्पोने पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, ट्रकच्या पाठीमागील बाजूस टेम्पोचे पुढील हूड अडकले. त्यामुळे टेम्पोला ट्रकने सुमारे सहाशे ते सातशे फूट फरफटत पुढे नेले. त्यामुळे या अपघातात इम्तियाज आणि शहबाज हे दोघे गंभीर जखमी झाले. डोक्याला आणि छातीला गंभीर जखम झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तश्राव झाला. यातच दोघांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर नागठाणे येतील अॅम्बुलन्स चालक व व्यवसायिक अब्दुल सुतार यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी टेम्पोतून अडकलेले मृतदेह बाहेर काढले. तसेच बोरगाव पोलिसही तेथे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहतूक पूर्ववत केली. त्यानंतर दोन्ही मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. या अपघाताची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली असून या अपघातातून बचावलेला टेम्पो चालक नफीस खान याच्यावर हलगर्जीपणा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.