दैनिक स्थैर्य । दि. २२ मार्च २०२३ । तळोदा ( जि. नंदूरबार ) । येथील ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी नगराध्यक्ष भरतभाऊ माळी, सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते उदयशंकर पाटील, मराठा क्रांती मोर्चाचे आबा पाटील, साक्री ( जि. धुळे ) च्या माजी पंचायत समिती सभापती कविता पाटील यांच्यासह विविध पक्षांतील असंख्य कार्यकर्त्यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सर्वांचे स्वागत केले. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला कामगार मंत्री सुरेश खाडे, आ. अमरिशभाई पटेल, आ. सुभाषबापू देशमुख, आ. विजयकुमार देशमुख, सोलापूर जिल्हाध्यक्ष आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. श्रीकांत भारतीय, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, विजय चौधरी, विक्रांत पाटील आदी उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या वेगवेगळ्या निर्णयांमुळे भारताची प्रतिमा जगात उंचावली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सर्व समाजघटकांच्या विकासाचा अर्थसंकल्प मांडून जनकल्याणकारी सरकार कसे असते हे दाखवून दिले आहे. नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे देशाचे, राज्याचे भले होईल अशी खात्री वाटू लागल्यानेच अनेक पक्षातील लोकप्रतिनिधी, नेते, सामाजिक कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करीत आहेत. या सर्व कार्यकर्त्यांचा पक्षामध्ये योग्य तो सन्मान राखला जाईल, असेही श्री. बावनकुळे यांनी नमूद केले.
भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये सोलापूरच्या दादाश्री प्रतिष्ठानचे गिरीश किवडे, उद्योजक रोहन रमेशदादा पाटील, सोमनाथ पाटील , तळोद्याच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष लक्ष्मण माळी, अनिल मगरे, माजी नगरसेवक जितेंद्र सूर्यवंशी, पंकज राणे, घोडदे ( ता. साक्री ) च्या माजी सरपंच सौ. अंजाबाई पवार, उपसरपंच जयश्री क्षीरसागर, मोहन अनगर, मराठा महासंघाचे विलास देसाई , मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक गणेश काटकर, शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष राजन घाग, विवेक सावंत, उद्धव ठाकरे गटाच्या शेतकरी सेनेचे विश्वास सावंत, दादासाहेब येडे पाटील, संतोष चौधरी आदींचा समावेश आहे.