दैनिक स्थैर्य । दि. १७ एप्रिल २०२२ । मुंबई । सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून दि. 06 एप्रिल ते दि. 16 एप्रिल असे सलग 11 दिवस राज्यभरात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाची आज सर्वत्र स्वच्छता मोहीम राबवून सांगता करण्यात आली.
विविध शहरातील महापुरुषांची स्मारके, बाजारतळ, जलाशय परिसर, प्रमुख रस्ते, चौक, शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे आदी ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली, यामध्ये विभागातील अधिकारी- कर्मचारी यांच्यासह स्थानिक नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतल्याचे दिसून आले.
मागील दोन वर्षात कोविड निर्बंधांमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम सार्वजनिक रित्या साजरा करता आला नव्हता. त्यामुळे यावर्षी धनंजय मुंडे यांनी राज्यभरात जयंती उत्सव शासकीय स्तरावरून साजरा करण्याची अनोखी संकल्पना राबवली होती.
याअंतर्गत मागील 11 दिवस राज्यभरातील सर्व जिल्ह्यातून समाज कल्याण कार्यालयांच्या माध्यमातून रक्तदान शिबिरे, व्याख्याने, मार्जिन मनी, मिनी ट्रॅक्टर यांसारख्याविविध योजनांच्या सामूहिक व व्यक्तिगत लाभ वितरणाचे कार्यक्रम, विविध योजनांबद्दल जनजागृती, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी अभिवादनाचे भव्य कार्यक्रम यांसारखे अनेक कार्यक्रम राज्यभरात राबवण्यात आले.
सामाजिक न्याय विभागाच्या मागील 11 दिवसातील सर्व उपक्रमांना यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेल्या स्थानिक लोकप्रतिनिधी, विभागातील अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व भीम अनुयायांचे धनंजय मुंडे यांनी आभार मानले आहेत.