दैनिक स्थैर्य | दि. ६ जून २०२३ | सातारा |
पुणे येथील विद्युत वितरण कंपनीच्या भरारी पथकाने वाईच्या औद्योगिक वसाहतीत रिलायंस इंन्टरप्रायजेस या कंपनीवर छापा टाकून ८१ हजार ४३४ युनिटची म्हणजे तब्बल १४ लाख ७२ हजार ५६० रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली आहे. या प्रकरणी तिघांवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाईच्या औद्योगिक वसाहतीत पुणे येथील विद्युत वितरण कंपनीचे भरारी पथक तपासणी करत असताना त्यांना या वीजचोरीची माहिती मिळाली होती. ‘रिलायंस इंन्टरप्रायजेस’ या कंपनीच्या मीटरची तपासणी करत असताना जोडणी वायरमध्ये छेडछाड करून ८१ हजार ४३४ युनिटची म्हणजे तब्बल १४ लाख ७२ हजार ५६० रुपयांची वीज चोरी उपकार्यकारी अभियंता विशाल बाळकृष्ण कोष्टी आणि तंत्रज्ञ पवण चव्हाण यांनी इतर सहकारी अधिकारी वर्गाला सोबत छापा टाकून उघडकीस आणली.
तपासणी करत असताना मे २०२२ पासून ते एप्रिल २०२३ पर्यंत पूर्ण वर्षभर वेळोवेळी मीटरमध्ये छेडछाड करून १४ लाख ७२ हजार ५६० रुपयांची वीजचोरी केल्याचे उघडकीस आल्याने कंपनी चालकासह कंपनीचे जागामालक असलेले मनोज सुदाम तरटे व विज वापरणारे विक्रम वसंत एरंडे, त्र्यंबक वसंत एरंडे अशा तिघांवर वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.