
स्थैर्य, फलटण, दि. 3 ऑक्टोबर : भैरवनाथ तरुण मंडळाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. श्रेयस कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले आणि रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गोरे यांनी केले. आपल्या मार्गदर्शनात प्रा. श्रेयस कांबळे यांनी चांगल्या व्यक्तींच्या संपर्कात राहूनच योग्य मार्गदर्शन मिळते, असे विद्यार्थ्यांना सांगितले व मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते हनुमंत केंगार आणि नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस संघटनेचे आटपाडी तालुका अध्यक्ष अमित आयवळे यांनी पुढील वर्षी हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवण्यात येईल, असे आश्वासन दिले. निरगुडीचे माजी ग्रामपंचायत सदस्य धनंजय लकडे यांनी मंडळाच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रदीप मोहिते, ढवळ गावचे उपसरपंच गणेश गोरे, बापूराव केंगार, सुनील जाधव, ॲड. भोसले, ॲड. बनसोडे उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष सुरज गोरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.