सासकल येथे दारू बंदीसाठी भैरवनाथ फाउंडेशनचा पुढाकार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २१ फेब्रुवारी २०२५ | फलटण |
सासकल, ता. फलटण येथील अवैधरित्या दारू विक्री अनेक वर्ष सुरू होती. याविरुद्ध सासकल जनआंदोलन समितीने अनेकदा आंदोलने करून पोलीस प्रशासनामार्फत कारवाई केली. तरीही दारू विक्रेते अवैधरित्या दारू व्यवसाय करतच होते; परंतु सासकल गावामध्ये नव्याने स्थापन झालेल्या श्री भैरवनाथ फाउंडेशनने पुढाकार घेऊन ही दारूबंदी केली आहे.

गावातील ज्ञानेश्वर हरिबा मुळीक यांच्या वस्तीवर रात्री भैरवनाथ फाउंडेशनचे पदाधिकारी, माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये अवैध दारू विक्री करणार्‍या व्यक्तींना बोलावून त्यांना सक्त ताकीद देऊन त्यांच्याकडून दारू बंद करत असल्याबाबतचे लेखी पत्र मागितले. त्यानुसार गावातील दोन्हीही दारू विक्रेत्यांनी ग्रामपंचायत ऑफिसमध्ये येऊन लेखी पत्र देऊन पुन्हा व्यवसाय सुरू केला तर कायदेशीर कारवाई करण्यासंबंधी संमती दिली.

गावच्या विधायक विकासासाठी व गावच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व शैक्षणिक प्रगतीसाठी तयार करण्यात आलेल्या भैरवनाथ फाउंडेशनमार्फत येत्या काळात जलसंधारण व मृदा संधारण याही क्षेत्रात भरीव काम करण्याचा मनोदय भैरवनाथ फाउंडेशनच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला. दारूबंदीसाठी घेतलेल्या पुढाकारामुळे भैरवनाथ फाउंडेशनच्या सर्व पदाधिकार्‍यांचे ग्रामस्थांनी आभार मानले असून त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी विक्रेत्यांच्या या कृतीचे स्वागत केले असून भैरवनाथ फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचेही आभार मानून त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

माजी सरपंच हणमंत गंगाराम मुळीक, माजी उपसरपंच सत्ता ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र घोरपडे, ज्ञानेश्वर हरिबा मुळीक, सामाजिक कार्यकर्ते मंगेश मदने, दीपक घोरपडे, देविदास विनोद भोसले, कमलाकर आडके, शिवशंकर माध्यमिक विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनायक मदने, अजित मुळीक, संदीप फडतरे, अनिल मुळीक,विनोद भोसले, शैला विनोद भोसले, किसन पवार यावेळी उपस्थित होते.

सासकल येथे दारू विक्री न करण्याबाबतचे लेखी पत्र शैला भोसले व गोरख बाबा मुळीक यांनी दिले.


Back to top button
Don`t copy text!