दैनिक स्थैर्य । दि.२३ मार्च २०२२ । वाई । काशीनाथाचं चांगभलं’ च्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थितीत साताऱ्यातील बावधन ( ता. वाई) येथील भैरवनाथाचे बगाड यात्रा उत्साहात पार पडली. सकाळी दहाच्या सुमारास बगाड्याला बगाडावर चढवून बगाड मिरवणुकीला सुरुवात झाली.
मागील दोन वर्षापासून बगाड यात्रा यात्रेवर काही बंधने होती. २०२० मध्ये टाळेबंदी जाहीर होण्यापूर्वीच बगाड यात्रा झालेली होती. तर मागील वर्षीच्या यात्रेला करोना प्रादुर्भावामुळे बंदी घातलेली असतानाही गावकऱ्यांनी परंपरा खंडीत होण्याच्या भीतीने गनिमीकाव्याने बगाड मिरवणूक काढून यात्रा साजरी केली होती. यावर्षी खुल्या वातावरणात बगाड यात्रा भरत असल्यामुळे गावकर्यांमध्ये मोठा उत्साह आहे. बगाड मिरवणूक पाहण्यासाठीही मोठ्या संख्येने यात्रेकरू जमा झाले आहेत. सर्व शिवार आणि रस्ते बगाड ओढणारे बैल आणि यात्रेकरू ग्रामस्थांच्या गर्दीने फुलून गेले आहेत.
होळी पौर्णिमेच्या दिवशी बावधन (ता वाई) येथील भैरवनाथ मंदिरात यावर्षीचा बगाड्या निवडण्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झाले होते. यावर्षीचा बगाडाचा मान बाळासाहेब मांढरे यांना मिळाला आहे. मागील पाच दिवसापासून ते गावात तील सर्व मंदिरात पूजा करून मंदिरातच मुक्कामाला असतात. सोमवारी रात्री बावधन येथे शेकडो ढोल ताशांच्या गजरात, गुलालाच्या उधळणीत मोठी शाही छबिना मिरवणूक निघाली होती. या छबिण्यात मोठ्या संख्येने ग्रामस्थ यात्रेकरू सहभागी झाले होते. सकाळी बगाड्याला आणि बगाडाचा रथ कृष्णा नदीच्या तीरावर सोनेश्वर येथे आणण्यात आला. तिथे ग्रामदेवतेच्या पूजा झाल्यानंतर सकाळी दहाच्या सुमारास बगाड्याला बगाडावर चढविण्यात आले आणि धुष्टपुष्ट बैलांच्या मदतीने दगडी चाकांचे अडीच तीन टन वजनाचा बगाडाचा रथ बघाड बैलांच्या मदतीने ओढून बगाड मिरवणुकीला सुरुवात झाली.शिवार निहाय व भावकी निहाय ठिकठिकानी बारा ते सोळा बैल जुंपून बगाडाचा रथ शेत शिवारातून ओढून बावधन गावात भैरवनाथ मंदिराकडे आणला जातो. सर्व बलुतेदारांना ही यात सहभागी करून घेतले जाते. यावर्षी करोना निर्बंध उठल्यानंतर यात्रा होत असल्याने यात्रेसाठी हजारो भाविकांनी व यात्रेकरूंनी बगाड यात्रा पाहण्यासाठी आलेल्यांची मोठी गर्दी केली आहे.कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, वाईच्या पोलीस उपाधीक्षक गणेश किंद्रे, डॉ शितल जानवे खराडे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे,आनंदराव खोबरे,सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे,रवींद्र तेलतुंबडे,अमोल माने,कृष्णराज पवार आदींच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त याठिकाणी नेमण्यात आला होता. सातारा जिल्हा परिषद व जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय पथक याठिकाणी दाखल आहे.वाई सातारा रस्त्यावर विविध खाद्य पदार्थ,खेळण्यांची दुकाने लागली आहेत.यात्रेत किरकोळ दुखापत वगळता यात्रा सुरळीत पार पडली.