श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांना प्रतिष्ठेच्या ‘स्कॉच’ राष्ट्रीय पुरस्कार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १५ नोव्हेंबर २०२१ | शिर्डीच्या | शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांना भारतातील अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘स्कॉच राष्ट्रीय पुरस्कार’ ऑनलाईन प्राप्त झाला आहे. नागपूर येथील रेशीम संचालनालयात संचालक पदावरून त्यांनी राबविलेले नावीन्यपूर्ण उपक्रम व सर्वांगीण कार्याची दखल घेऊन त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला आहे.

नवी दिल्ली स्थित स्कॉच फाऊंडेशन यांच्या वतीने 2003 पासून स्कॉच पुरस्कार दिला जातो. ऑस्कर पुरस्काराच्या धर्तीवर भारतात दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा हा पुरस्कार आहे. 13 नोव्हेंबर 2021 रोजी ऑनलाईन सोहळ्यात हा पुरस्कार श्रीमती बानायत यांना जाहीर करण्यात आला. यावेळी ऑनलाईन प्रमाणपत्र त्यांना देण्यात आले. प्रशासनात राबविलेल्या उत्कृष्ट उपक्रमांबद्दल त्यांना रजत पदक देण्यात आले आहे. कठोर निकष व मूल्यांकनातून गव्हर्नन्स मध्ये दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या स्कॉच पुरस्कारावर यंदा महाराष्ट्रातून श्रीमती बानायत यांनी मोहोर उमटवली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

सार्वजनिक क्षेत्र, शासकीय विभागात गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्या अधिकारी व संस्थांची निवड समितीद्वारे मूल्यांकन, नागरिकांचे मतदान अशा परिमाणांवर कामांचे प्रमाणिकरण व परीक्षण करून कडक निकषांच्या मूल्यांकन प्रक्रियेद्वारे ‘स्कॉच’पुरस्कारासाठी निवड करून सुवर्ण, रजत व कांस्य पदक देण्यात येत असतो. या प्रक्रियेमुळे इतर पुरस्कारापेक्षा ‘स्कॉच’ पुरस्कार आगळावेगळा व उल्लेखनीय ठरतो.

या पुरस्काराबद्दल श्रीमती बानायत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली की, रेशीम संचालक असतांना राबविलेले उपक्रम व  नावीन्यपूर्ण कामाबद्दल मला हा पुरस्कार मिळाल्याने आनंद झाला आहे. अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा पुरस्कार मला महाराष्ट्रातून ‘गव्हर्नन्स’ मध्ये केलेल्या कामासाठी मिळाला आहे. त्यामुळे या पुरस्काराने प्रशासनात अजून चांगले काम करण्यास प्रेरणा मिळणार आहे.


Back to top button
Don`t copy text!