स्थैर्य, मुंबई, दि.२६: शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात केवळ 50 जणांच्या उपस्थितीत पार पडत आहे. कोरोना संकटामुळे दरवर्षी दसरा मेळावा शिवाजी पार्कात करण्याची परंपरा खंडीत होत आहे. आज सोशल डिस्टस्टिंगचे सर्व नियम पाळत हा दसरा मेळावा पार पडत आहे. आता यामध्ये शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात झाली आहे. हे सरकार लवकरच पडेल असेल म्हणणाऱ्यांवर त्यांनी निशाणा साधला आहे. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, आम्ही तुमच्यासारखे गुळाच्या ढेपेला चिटकणारे मुंगळे नाही असे ते म्हणाले आहेत.
‘अनेक जण तारीख पे तारीख देतात. अनेक जण सरकार पाडण्याचे स्वप्न बघतात. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, आम्ही तुमच्यासारखे गुळाच्या ठेपेला चिटकणारे मुंगळे नाही. जर वाटेला जाल तर मुंगळा कसा डसतो हे दाखवल्या शिवाय दाखवणार नाही. मी वाघाची औलाद आहे, त्याला जर डिवचले तर काय होत असते ते इतिहासात दाखले आहे. ‘ असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना दिला आहे.
जीएसटीच्या मुद्द्यावर केंद्र सरकारवर निशाणा साधला. जीएसटी करपद्धत ही फसवी आहे. तसेच जीएसटी प्रणाली फसलेली असेल तर जुनी करपद्धती आणा असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचा राज्यपालांवर निशाणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी राज्यपालांवरही निशाणा साधला आहे. मंदिरे खुली करण्यावरून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हिंदुत्वावरून डिवचले होते. यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा राज्यपालांवर निशाणा साधला आहे. नाव न घेता त्यांनी निशाणा साधला. काळी टोपी घालणाऱ्यांनी सरसंघचालक हिंदुत्वाबाबत काय म्हणतात ते समजून घ्यावे असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.
मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये सरसंघचालक मोहन भागवतांवर निशाणा साधला आहे. ‘घंटा वाजवा, थाळ्या बडवा हेच तुमचे हिंदुत्व आहे का? असा सवाल ठाकरेंनी विचारला. तसेच तुमच्या टोपीखाली जर डोकं असेल तर मोहन भागवत यांनी काय सांगितले त्याचा जरा विचार करा, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिला आहे.
भाजपवाल्यांनो भाडोत्री बाप तुम्हालाच लखलाभ असो, माझा बाप हा महाराष्ट्र आहे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. ठाकरे म्हणाले की, राज्य सरकारने केंद्राकडे जीएसटीचे थकलेले पैसे मागण्यात काहीही गैर नाही. आम्ही हे पैसे मागितले तर भाजप नेते टीका करतात. तुम्ही लग्न केले आणि आता बापाकडे पैसे कशाला मागता, असे रावसाहेब दानवे म्हणाले होते. मात्र, माझा बाप केंद्रात नाही. तो भाडोत्री बाप तुम्हालाच लखलाभ असा टोला ठाकरेंनी लगावला. माझा बाप महाराष्ट्राच हाच आहे, माझ्या विचारातून आणि कृतीतून वेळोवेळी त्याचे अस्तित्त्व तुम्हाला दिसून येईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.