भविष्यात अधिकार्‍यांचे गाव म्हणून भाडळी बुद्रुक ओळखले जाईल – राहुल गावडे

आजी माजी विद्यार्थी व ग्रामस्थांच्यावतीने यशस्वीतांचा सन्मान सोहळा


स्थैर्य, फलटण, दि. 6 नोव्हेंबर : भाडळी बुद्रुक (ता. फलटण) येथील तरुणांनी सैनिकी परंपरेसोबतच प्रशासनातील विविध क्षेत्रात दैदिप्यमान यश मिळवले आहे. या यशामुळे भविष्यामध्ये हे गाव ‘अधिकाऱ्यांचे गाव’ म्हणून ओळखले जाईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांनी केले.

भाडळी बुद्रुक येथील जाणता राजा प्रतिष्ठान, नेहरू युवा मंडळ, आजी-माजी विद्यार्थी व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित यशस्वीतांचा सन्मान सोहळा आणि येथील जिल्हा परिषद शाळेत २४ वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा देणाऱ्या सुषमा पोपटराव आडके यांच्या नागरी सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक समितीचे सुभेदार डुबल गुरुजी, शिक्षक बँकेचे संचालक शशिकांत सोनवलकर, पत्रकार सुभाष सोनवलकर, पोलीस पाटील हनुमंत सोनवलकर, तंत्र अधिकारी सागर डांगे, परिवहन अधिकारी कोमल डांगे आणि स्टेट बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक शुभम डांगे उपस्थित होते.

राहुल गावडे म्हणाले, “वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये यश संपादन केलेल्यांचा सन्मान सोहळा आयोजित केल्याने गावाची सामाजिक बांधिलकी दिसून येते. अशा प्रकारचे सत्कार यशस्वीतांच्या कायम स्मरणात राहतील.”

अरविंद मेहता म्हणाले, “प्रशासनामध्ये काम करत असताना तळागाळातील लोकांना योग्य ते सहकार्य आणि मदत व्हावी.” यावेळी मान्यवरांच्या हस्ते सुषमा आडके यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात अभिजीत डांगे (महसूल), प्रदीप शिरतोडे, अक्षय माने (कृषी), प्रियंका ठोंबरे (जलसंपदा), सुप्रिया डांगे-कदम, हनुमंत जाधव (शिक्षण), ऐश्वर्या भोईटे (सेफ्टी ऑफिसर), ह.भ.प. राहुल शेंडे (कलारत्न पुरस्कार) आणि अ‍ॅड. प्रवीण डांगे (विधीज्ञ) यांचा त्यांच्या पालकांसमवेत सन्मान करण्यात आला.

“ग्रामस्थांनी आणि माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या सत्कारामुळे मी भारावून गेले असून, आजवरच्या सन्मानापेक्षा हा सत्कार मोठा आहे. मी गावाच्या कायम ऋणात राहीन,” अशा भावना सुषमा आडके यांनी व्यक्त केल्या.

याप्रसंगी राहुल गावडे यांची जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल व ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त ग्रामस्थांच्या वतीने त्यांचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, शाळेचे आजी-माजी विद्यार्थी, आजी-माजी सैनिक, ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मातोश्री संस्था समूहाचे चेअरमन मोहनराव डांगे यांनी प्रास्ताविक केले. संदीप शेंडे यांनी आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!