दैनिक स्थैर्य । दि. १७ जुलै २०२१ । फलटण । ‘‘भाडळी बुद्रुक गावाला सैनिकी परंपरा आहे. गावातील पदवीधर युवक – युवतींनी जर परिश्रम घेवून चिकाटीने स्पर्धा परीक्षा दिल्यास हे गाव भविष्यात अधिकार्यांचे गाव म्हणूनही नावारुपास येईल’’, असा विश्वास फलटण पंचायत समितीचे सदस्य सचिन रणवरे यांनी व्यक्त केला.
भाडळी बुद्रुक येथील शुभम रामदास डांगे यांची ‘आरबीआय’ मध्ये असिस्टंटपदी निवड झाल्याबद्दल जाणता राजा प्रतिष्ठान, नेहरू युवा मंडळाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात रणवरे बोलत होते. यावेळी दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर, सासकलचे माजी सरपंच मोहनराव मुळीक, तिरकवाडीचे उपसरपंच नानासाहेब काळुखे, पोलीस पाटील हनुमंत सोनवलकर, उद्योजक मोहन यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘‘प्रतिकुल परिस्थितीवर मात केल्यास स्पर्धा परीक्षेसह अन्य क्षेत्रात निश्चित यश मिळते’’, असे शशिकांत सोनवलकर यांनी सांगितले.
यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तानाजी डांगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे औचित्य साधून स्मशानभुमी परिसरात वृक्षारोपण आणि कोरोना काळामध्ये उल्लेखनीय कार्य करणार्या आरोग्य अधिकारी व, कर्मचारी,अंगणवाडी सेविका,आशा स्वयंसेविका यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास सासकलचे माजी उपसरपंच संजय कुमार चांगण, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष तानाजी डांगे, ग्रामपंचायत सदस्य सचिन सूर्यवंशी, माजी उपसरपंच दत्तात्रय डांगे, ग्रामपंचायत सदस्य सचिन शिरतोडे, मंगेश माने यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहनराव डांगे यांनी केले/आभार ह.भ.प. स्वप्नील महाराज शेंडे यांनी मानले.