दैनिक स्थैर्य | दि. ७ जुलै २०२३ | फलटण |
शिक्षण विभागाच्या बदली प्रक्रियेत जि. प. प्राथमिक शाळा भाडळी बु., ता. फलटण येथील मुख्याध्यापक श्री. दिलीप देशमुख यांची बदली खटाव तालुक्यात झाली. त्यानिमित्त त्यांचा निरोप समारंभ तसेच त्यांच्या जागी नव्याने रुजू झालेले श्री. सुनिल खरात यांचा स्वागत समारंभ अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन भाडळी ग्रामस्थ, पालकवर्ग तसेच शालेय व्यवस्थापन समिती यांच्या वतीने नुकतेच जि. प. प्राथमिक शाळेमध्ये करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फलटण तालुका कृषी अधिकारी श्री. सागर डांगे होते.उपस्थितांमध्ये मातोश्री विकास सेवा सोसायटीचे संस्थापक-चेअरमन श्री. मोहनराव डांगे, श्री. पोपटराव भोईटे, श्री. दादासाहेब डांगे, ग्रामपंचायत सदस्य श्री. सचिन शिरतोडे, शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष श्री. अमोल डांगे, श्री. राम भोईटे, श्री. धर्मेंद्र शिरतोडे, श्री. प्रविण डांगे हे होते.
सत्काराला उत्तर देताना श्री. देशमुख यांनी सेवेतील पाच वर्षांतील अनेक अनुभव सांगितले. या कार्यकाळात ग्रामस्थांसह पालकांचे विशेष सहकार्य लाभल्याचे सांगितले. आजवरच्या एकूण सेवाकाळातील भाडळी बु. मधील सेवाकाळ निश्चित स्मरणात राहील, असे त्यांनी आवर्जून सांगितले. या काळातील सहकारी शिक्षक श्री. अमित जाधव यांच्या साथीने आपण केंद्र शाळेमध्ये गुणवत्तेमध्ये अव्वल राहिल्याचे स्पष्ट केले.
यावेळी श्री. मोहनराव डांगे यांनी आपल्या मनोगतात जि. प. प्राथमिक शाळेचा शैक्षणिक आलेख उंचावत राहण्यासाठी ग्रामस्थांचे निश्चित सहकार्य राहणार असल्याचे सांगितले. तसेच शाळेचा शैक्षणिक दर्जा टिकवण्याचे आवाहन केले.
तसेच नवनियुक्त मुख्याध्यापक श्री. सुनील खरात यांनी मनोगतामध्ये आपण या स्वागताने भारावून गेलो असल्याचे म्हटले. यापुढेही विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली.
प्रास्ताविक आणि स्वागत उपशिक्षक श्री. अमित जाधव यांनी केले.
कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. राम भोईटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.