स्थैर्य, फलटण, दि. ६ : बैलगाड्यांच्या शर्यतीस शासनाची बंदी असतानाही भाडळी खु. ता. फलटण येथे बेकायदेशीरपणे शर्यतींचे आयोजण केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, दि. ३ जानेवारी रोजी भाडळी खु. ता. फलटण येथे सकाळी नऊच्या सुमारास चोरमले वस्ती नजीक प्रशांत सोनवलकर यांच्या रानात बैलांच्या शर्यतीस शासनाची बंदी असतानाही लोकांच्या मनोरंजनासाठी बेकायदेशीरपणे बैलांचा शर्यतीसाठी वापर केल्याप्रकरणी सुभेदार तथा पिंटू जमादार डुबल, अमोल विठ्ठल कोळपे दोघेही रा. भाडळी खु., विकास चांगण रा. सासकल, सचिन गुंजवटे रा. झिरपवाडी, प्रणय नवनाथ भंडलकर तथा गुरव रा. तिरकवाडी ता. फलटण यांच्याविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात जमावबंदीचे उल्लंघन, प्राण्यांना निर्दयीपणे व क्रुरपणे वागवणेस प्रतिबंध, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, भारतीय साथ रोग अधिनियम या कलमांन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या बाबत भाडळी खु. चे पोलीस पाटील हणमंत सोनवलकर यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार एस व्ही खाडे करित आहेत.