
दैनिक स्थैर्य । दि. २३ फेब्रुवारी २०२२ । फलटण । मंगळवार दि. २२ फेब्रुवारी रोजी श्री क्षेत्र लाटे ता. बारामती येथील श्री आईसाहेब महाराज पालखी सोहळा (वर्ष २२वे) शेवटच्या मुक्कामी मौजे भाडळी बु. येथे आल्यानंतर समस्त ग्रामस्थांच्या वतीने पालखी सोहळ्याचे सहर्ष स्वागत करण्यात आले. हा पालखी सोहळा श्रीक्षेत्र लाटे येथून सुरू होऊन किरकसाल ता. माण येथुन परतीच्या प्रवासाला निघतो. श्री. आईसाहेब महाराज पालखी रथाचे स्वागत माजी सरपंच मोहनराव मुळीक यांच्या शुभहस्ते करण्यात आले. श्री आई साहेब महाराज यांची आरती माजी सैनिक अजय कुमार डांगे यांच्या शुभहस्ते करण्यात आली. आरती नंतर ह. भ. प. सतीश महाराज खोमणे यांचे कीर्तन झाले.
उपस्थित मान्यवरांना प्रतिष्ठानच्या वतीने आंब्याचे रोप देऊन स्वागत करण्यात आले. रात्री महाप्रसादाचे आयोजन समस्त ग्रामस्थ भाडळी बु. यांच्यावतीने करण्यात आले होते. संपुर्ण पालखी सोहळ्याचे नियोजन जाणता राजा प्रतिष्ठान आणि नेहरु युवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले. रात्रीच्या मुक्कामानंतर बुधवारी सकाळी सात वाजता सदर पालखी सोहळ्यास निरोप देण्यात आला. यावेळी युवा नेते मोहनराव डांगे यांनी सर्वांचे आभार मानले.