स्थैर्य, फलटण, दि. २२: फलटणसह संपूर्ण सातारा जिल्ह्यात वाढती कोरोना रुग्ण संख्या, कोरोना तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर रुग्ण संख्या आणखी वाढण्याची शक्यता आणि म्युकर मायक्रोसीस या बुरशीजन्य आजाराचे या भागात आढळणारे रुग्ण या सर्वांचा विचार करुन आगामी काळातील कोरोना उपचाराचे नियोजन करण्याच्या स्पष्ट सूचना महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रशासन यंत्रणेला दिल्या आहेत.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोरोना आढावा बैठकीस आ. दीपकराव चव्हाण, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, नगर परिषद मुख्याधिकारी संजय गायकवाड, गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे पवार, उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्यंकट धवन, शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, ग्रामीण पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक नितीन सावंत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता महेश नामदे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
केवळ कोरोना वाढता प्रादुर्भाव विचारात न घेता त्यासोबत आगामी काळात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याच्या माहितीचा विचार करुन वाढणारी संभाव्य रुग्ण संख्या, तिसऱ्या लाटेची अपेक्षीत तीव्रता या बाबी विचारात घेऊन उपाय योजनांची आखणी करणे व तिसऱ्या लाटेसाठी सतर्क राहणे हे अत्यंत गरजेचे असल्याने प्रशासनाने तिसऱ्या लाटेचा विचार करुन उपाय योजनांची आखणी करावी अशा स्पष्ट सूचना यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सर्व विभागांना दिल्या आहेत.
सध्या फलटण शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागांमध्ये कोरोना आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. त्यासाठी लोकसहभागातून जिल्हा परिषद गट निहाय विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहेत काही ठिकाणी उभारणी सुरु आहे, ती २/४ दिवसात पूर्ण होईल तथापी ग्रामीण भागांतील कोरोना बाधीत अनेक व्यक्ती गृह विलगी करणात राहणे पसंत करीत आहेत अशा रुग्णांना विलगीकरण कक्षात राहणे कसे फायदेशीर आहे हे समजावून देवून त्यांना प्रसंगी सक्तीने विलगीकरण कक्षामध्ये दाखल करावे असे स्पष्ट निर्देश श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिले.
सध्या कोरोना बरोबरच कोरोना झालेल्या नागरिकांमध्ये म्यूकर मायक्रोसिस म्हणजेच काळी बुरशीजन्य आजार फैलावत असल्याने त्याबाबत योग्य उपचाराचे तसेच त्याबाबत नागरिकांना योग्य माहिती देवून सतर्क राहण्याचे आवाहन करण्याची गरज असल्याने त्याबाबत योग्य नियोजन करण्याच्या सूचना देताना फलटण मध्ये लवकरात लवकर एकाच छताखाली म्युकर मायक्रोसिस रुग्णांना कशाप्रकारे वैद्यकीय उपचार देता येतील, त्याबाबत नियोजन करावे. या आजाराचे रुग्ण आज कमी असले तरी त्या सर्वांना पूर्णतः उपचार फलटण मध्येच मिळतील अशा रीतीने आखणी करण्याच्या सूचना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी केल्या आहेत.
सध्या कुटुंबामधील कोणीही एक व्यक्ती कोरोना बाधीत असेल तर संपूर्ण कुटुंबाच्या कुटुंब कोरोना बाधीत होत आहेत, त्यामुळे कुटुंबातील कोणालाही कोरोनाची लक्षणे दिसली तरी तातडीने कुटुंबातील सर्वांनी कोरोना चाचणी करुन घेऊन आपल्या कुटुंबाला कोरोना पासून सुरक्षीत ठेवावे असे आवाहन आ. दीपक चव्हाण यांनी केले.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना कोरोना होण्याचे प्रमाण अधिक असण्याची भीती व्यक्त करण्यात येत असल्याने कोरोनाची तिसरी लाट गृहीत धरुन फलटण शहरांमध्ये लहान मुलांवर कोरोनाचे उपचार होण्यासाठी शासकीय व खाजगी रुग्णालयांची निर्मिती करण्यात यावी. त्या रुग्णालयांमध्ये फक्त आणि फक्त लहान मुलांना उपचार देण्यात यावेत अशी अपेक्षा व्यक्त करताना याबाबत अधिक माहिती घेऊन प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी केल्या आहेत.
प्रारंभी प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी शहर व तालुक्यातील रुग्ण संख्या, उपचार घेत असलेले रुग्ण संख्या, उपलब्ध बेडस, लसीकरण नियोजन याविषयी सविस्तर माहिती दिली.