सावधान! युनियन बँकच्या नावावर फसवणूक: सायबर सेलचा इशारा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 19 जुलै 2024 | पुणे | गेल्या काही दिवसांमध्ये अनेक नागरिकांना अनोळखी मोबाइल क्रमांकवरून युनियन बँक ऑफ इंडियाचे नाव, लोगो आणि फोटो वापरून संदेश पाठवण्यात आले आहेत. या संदेशांमध्ये व्हायरसयुक्त फाइल्स जोडल्या जातात आणि नागरिकांना त्यावर क्लिक करण्यास प्रवृत्त केले जाते. या फसवणुकीमुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान होत आहे आणि त्यांची गोपनीय माहिती गळती होण्याचा धोका निर्माण होत आहे.

याबाबत पोलीस आयुक्तालय, सायबर सेलने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. सायबर सेलकडे अशा प्रकारच्या फसवणुकीच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. या संदेशांमध्ये नागरिकांना त्यांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अपडेट करण्यास सांगितले जाते आणि त्यासोबतच फाइल जोडली जाते. नागरिक फाइल डाउनलोड करतात आणि क्लिक करतात तेव्हा त्यांच्या मोबाइलमध्ये “टारझन” नावाचा व्हायरस प्रवेश करतो. हा व्हायरस नागरिकांची वैयक्तिक माहिती चोरून त्यांच्या आर्थिक व्यवहारांचे नुकसान करू शकतो.

पोलीसांचा सल्ला:

  • अनोळखी क्रमांकांवरून आलेल्या संदेशांमधील लिंक, वेबसाइट किंवा फाइल्सवर क्लिक करू नका.
  • युनियन बँक ऑफ इंडिया कधीही अशा प्रकारे संदेश पाठवत नाही.
  • आपल्या बँक खात्याशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी, थेट बँकेशी संपर्क साधा.
  • संशयास्पद संदेशांबद्दल सायबर सेलला 1800-180-1234 या क्रमांकावर कळवा.

नागरिकांनी जागरूक राहून अशा फसवणुकीपासून स्वतःचे आणि इतरांचे संरक्षण करणे गरजेचे आहे.


Back to top button
Don`t copy text!