दैनिक स्थैर्य । दि. १६ ऑगस्ट २०२२ । फलटण । तमाम देशवासियांना स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा ! विविधतेत एकता ही भारतीय लोकशाहीची खरी ताकद आहे. ही ताकद अबाधित राखत भारतीय राज्यघटना, लोकशाही व्यवस्था, सर्वधर्मसमभावाच्या मूल्यांची जपणूक करण्याचा निर्धार करूया ! देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या वीर शहिदांना श्रद्धांजली अर्पण करतो. देशाच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या भारतमातेच्या सुपुत्रांच्या त्याग, बलिदानाबद्दल तसंच त्यांच्या कुटुंबियांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, असे मत विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
भारत देश भौगौलिक, सामाजिक, सांस्कृतिक विविधतेनं नटलेला, विपुल नैसर्गिक साधनसंपत्ती, लोककला, लोकसंस्कृती व इतिहासाचा गौरवशाली वारसा लाभलेला समृद्ध देश आहे. देशाची विविधता हीच देशाची खरी शक्ती आहे. सशक्त, समर्थ, समृद्ध, बलशाली भारत आपल्याला घडवायचा आहे. कोट्यवधी स्वातंत्र्यवीरांच्या त्यागातून मिळालेलं स्वातंत्र्य अबाधित ठेवणं, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता कायम राखणं, भारतीय राज्यघटना, लोकशाही व्यवस्था व मूल्यांचं जतन करणं, त्यांना बळकट करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्यं आहे. हे कर्तव्य पार पाडत असतानाच देशाची प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी विचारधारा पुढे नेणं, सर्वधर्मसमभावाचा आदर करीत समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर अथक, निरंतर चालत राहण्याचा निर्धार करुया, असेही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.