माहितीपूर्ण व उपयुक्त “शायनिंग महाराष्ट्र” प्रदर्शनाला भेट देवून लाभ घ्या : खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २६ मार्च २०२२ । फलटण । केंद्र शासनाच्या जनजागृती अभियानांतर्गत फलटण येथे आयोजित करण्यात आलेले “शायनिंग महाराष्ट्र” हे प्रदर्शन शेतकरी, विद्यार्थी, व्यावसायीक, महिला अशा समाजातील सर्व घटकांसाठी माहितीपूर्ण आणि विविध क्षेत्रातील नवी माहिती उपलब्ध करुन देणारे असल्याने प्रत्येकाने या प्रदर्शनाला भेट देवून लाभ घ्यावा असे आवाहन खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे.

केंद्रीय मंत्रालयांतर्गत विविध विभागांचे “शायनिंग महाराष्ट्र” हे प्रदर्शन केंद्र शासन आणि स्वराज फौंडेशन व सांसा फौंडेशन यांच्या संयुक्त सहभागाने उभारण्यात आले असून प्रदर्शनाचा शुभारंभ खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फित कापून समारंभपूर्वक करण्यात आला, त्यावेळी ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, जिल्हा परिषद सदस्या अड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, तहसिलदार समीर यादव, गटविकास अधिकारी तथा प्रशासक डॉ. सौ. अमिता गावडे पवार विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या संकल्पनेतून फलटण शहरालगत, जाधववाडी ता. फलटण येथील शुभारंभ लॉन्स या मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन दि. २५ ते २७ मार्च दरम्यान दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत खुले राहणार आहे. या प्रदर्शनामध्ये केंद्र शासनाच्या विविध ५५ विभागांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृषी विभाग, संरक्षण विभाग, अंतराळ विभाग, अक्षय ऊर्जा विभाग, आयुष मंत्रालय, पोस्ट खाते आदी विभाग समाविष्ट आहेत. सदर स्टॉलद्वारे त्या त्या विभागाचे महत्व, त्यांच्या योजना, त्यांची अंमलबजावणी कशी व्हावी, त्यांची उपयुक्तता, शेती विषयक, प्रदुषणविषयक योजना, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम, नाबार्ड योजनेतील महिला बचत गटाचे स्टॉल, बांबू पासून बनविण्यात आलेल्या वस्तू, विविध औषधे, तंत्रज्ञान यांची माहिती व प्रात्यक्षिक दाखविण्यात येत आहे.

या शिवाय खादी आणि ग्रामोद्योग विकास अंतर्गत खादी, दोर, ताग, पर्यावरणस्नेही (इको फ्रेंडली) हातमाग आणि ग्रामीण कारागीरांची हस्तकला यांचाही या प्रदर्शनामध्ये समावेश आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, महिलावर्ग व ज्येष्ठ मंडळी, नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. केंद्र सरकारच्या सर्व योजनांची माहिती या प्रदर्शनामध्ये उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचे नमूद करीत या विनामूल्य प्रवेश असलेल्या प्रदर्शनाला सर्वांनी सहकुटुंब भेट द्यावी असे आवाहन खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि भाजपा पदाधिकारी यांनी केले आहे. आज पहिल्याच दिवशी प्रदर्शन पाहण्यासाठी शहर व तालुक्यातील नागरिक स्त्री – पुरुष, तरुण वर्ग, महिला व विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती.


Back to top button
Don`t copy text!