दैनिक स्थैर्य । दि. १९ डिसेंबर २०२१ । फलटण । फलटण तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी भारतीय कृत्रिम अवयव निर्मिती निगम तर्फे आयोजित केलेल्या विशेष कॅम्प हा दिव्यांग व्यक्तींसाठीचा लाभदायी असून कॅम्पमध्ये त्यांची तपासणी होऊन पुढील कॅम्पमध्ये त्यांना उपयोगी साधने मोफत दिली जाणार आहेत. तरी उद्या जेष्ठ नागरिकांच्यासाठीच्या याच ठिकाणी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याचा फायदा जास्तीती जास्त जेष्ठ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलेले आहे.
फलटण येथील सजाई गार्डन येथे फलटण तालुक्यातील दिव्यांग व्यक्ती व जेष्ठ नागरिकांसाठी भारतीय कृत्रिम अवयव निर्मिती निगम तर्फे १९ डिसेंबर व २० डिसेंबर रोजी विशेष कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे. सदरील कॅम्पच्या उद्घाटन प्रसंगी ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, पंचायत समितीचे सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर, नगराध्यक्षा सौ. नीता मिलिंद नेवसे, प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप, पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे – पवार, मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फलटण तालुक्यासाठी भारतीय कृत्रिम अवयव निर्मिती निगम तर्फे दिव्यांग व्यक्ती व जेष्ठ नागरिकांसाठी आयोजित केलेला कँम्पचे कामकाज कौतुकास्पद असून सदरील कॅम्पचा नक्कीच फायदा फलटण तालुक्यातील दिव्यांग व्यक्ती व जेष्ठ नागरिकांना होईल, असे मत माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
भारतीय कृत्रिम अवयव निर्मिती निगम तर्फे हालचालीसाठी सहाय्यक साधने – प्रौढांसाठी व्हील चेअर, लहानांसाठी व्हील चेअर, तीन चाकी सायकल, तीन चाकी सायकल, कुबडी, चालण्याची काठी, सेरेब्रल पाल्सीमध्ये उपयोगी साधने – सीपी खुर्ची, दृष्टीदोषामध्ये उपयोगी साधने – ऑडिओ प्लेयर, स्मार्टफोन, स्मार्ट केन, ब्राइल्ले स्लेट, श्रवणदोषामध्ये उपयोगी साधने – डिजिटल हेअरिंग मशीन, बौद्धीक दिव्यांग व्यक्तींना उपयोगी साधने – अभ्यासउपयोगी विविध डिजिटल उपकरणे, कृत्रिम हात, पाय, वृद्ध व्यक्तींसाठी उपयोगी साधणे – चालण्याची काठी, चालण्यासाठी वॉकर, चष्मा, खुर्ची यासह विविध साधने देण्यात येणार आहेत, असेही प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी यावेळी स्पष्ट केले.