
दैनिक स्थैर्य । 10 जुलै 2025 । फलटण । फलटण तालुक्यातील गिरवी परिसरातील गिरवी, धुमाळवाडी, बोडकेवाडी, जाधववाडी, निरगुडी, विंचुर्णी, मांडवखडक, दरेवाडी, दालवडी, ताथवडा, उपळवे, वेळोशी, सावंतवाडी, दुधेबावी, जावली, आंदरुड, वाखरी, ढवळ येथे बेंदूर सण उत्साहात साजरा करण्यात आला.
बेंदरानिमित्ती सकाळपासून बैलाला अंगोळ घालून रंगीबेरंगी बेगडी शिंगाला लावण्यात आल्या होत्या. आकर्षक सौंदर्यासाठी झुली बैलांच्या अंगावर चढविल्या. घरातील सुवासिनींनी हळद कुंकू लावून पुजा केली. पुरण पोळीचा नैवेद्य दाखविला. दुपारनंतर बैलांची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. गावातील मारुती मंदिरात दर्शनासाठी बैल घेऊन येतात. मिरवणूक काढून बैलांच्या जोड्यांवर गुलालाची उधळण करण्यात आली.
ढोल ताशा, झांज पथक, हलगी वादक बेंजो वाजवून शेतकर्यांनी बैलांची ग्रामप्रदिक्षणा केली. ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर, महादेव मंदिर, विठ्ठल रखुमाई मंदिर गोपाळकृष्ण मंदिर याठिकाणाहून ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली. बेंदूर सण उत्सव वेगवेगळ्या पध्दतीने जल्लोषात आनंदात साजरा करण्यात आला.
काळाच्या ओघात अनेक रुढी, चालीरीती नष्ट होत असल्याबद्दल वयोवृद्ध बैल मालक यांनी खंत व्यक्त केली. बेंदूर सणाच्या दिवशी लेझीम, गजी नृत्य, झांज पथक हलगी वादक या लोकसंस्कृती लोप पावत चाललेल्या आहेत. गिरवी व गिरवी परिसरातील बैलांची संख्या लक्षणीय प्रमाणात घट झाली आहे.
बैलगाडी शर्यतीमुळे काही जण बैल सांभाळता दिसून येत आहेत. वाढत्या महागाईमुळे शेतकर्यांना बैल संभाळणे कठिण झाले असल्यामुळे बैलांची संख्या लक्षणीय घटलेली आहे.सध्या काही वर्षांपासून मिरढे सारख्या काही गावातून वाजतगाजत टॅक्टरची मिरवणूक निघते. हीच भविष्यात प्रथा रुढ होईल, असे संकेत ग्रामीण भागात दिसून येते आहे.