
बेंदूर, ज्याला बैल पोळा म्हणूनही महाराष्ट्र राज्यातील काही भागात ओळखले जाते.बेंदूर व पोळा सण उत्सव वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या पध्दतीने साजरे केले जातात.बेंदुर हा महाराष्ट्रातील एक महत्वाचा शेतकरी व बैल,श्रम संस्कृतीचा गौरव करणारा, कृषीप्रधान सण आहे. हा सण बैलांप्रती, श्रमप्रतिष्ठा जोपासणारा,श्रमसंस्कतीचा सन्मान करणारा व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जाणारा बेंदूर सण आहे.कारण शेतीमध्ये बैलांची जोडी, बैलगाडी, नांगर,पेरणी शेती मशागत यांची भूमिका फार महत्त्वाची असते. सध्या कालानुरुप कृषी क्षेत्रातील झपाट्याने बदल होत गेले.बैलाची जागा आता ट्रॅक्टर घेत आला आहे.
शेतीतील मशागतीची कामे व पेरणीची कामे ट्रॅक्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होत आहेत.शेतकरी बैलांवर कुटुंबातील सदस्याप्रमाणे माया प्रेम करतो.दिवसभर शेतात राबराब राबून घरी आल्यावर शेतकरी बैलांच्या अंगावरून मायेने गोंजारत पाठीवर थाप टाकल्यावर बैल मान हलवत शेतकरी राजाकडे तोंड वळवून जिभेने शेतकर्यांचा हात चाटतो. तेव्हा शेतकर्यांच्या डोळ्यात पाणी तरळते.असं शेतकरी व बैलांचं मायेचं नातं पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे.आता ट्रॅक्टर आले तरी बेंदराच्या सणासुदीला शेतकरी ट्रॅक्टर धुऊन रिफिन गोंडे पताका लावून पुजा करुन सर्व शेतकरी टॅक्टरची वाजतगाजत मिरवणूक गावातून काढतात
बेंदूर हा सण बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. शेतीत वर्षभर कष्ट करणार्या बैलांच्या कामाचा गौरव करणे हा यामागे मुख्य उद्देश असतो.
बेंदूर हा सण शेतकर्यांसाठी खूप महत्वाचा आहे. बैलांमुळे शेतीची कामे सोपी होतात आणि चांगले उत्पन्न मिळते, त्यामुळे शेतकरी बैलांना देवाप्रमाणे मानतात. बेंदूर या दिवशी बैलांना स्वच्छ धुवून, शिंगांना रंग लावून,बेगीड चिटकावत, बैलांच्या अंगावर विविध रंग लावून नक्षी काढतात.आकर्षक रंगबिरंगी झली घालतात. शेतकर्यांच्या घरातील सुवासिनी स्त्रिया बैलांना ओवाळून पुरणपोळी, गूळ, शेंगदाणे इत्यादी यांचा नैवेद्य दाखवून गोड पुरणपोळी खायला घालतात तसेच इतर आवडते पदार्थ खायला दिले जातात. महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागात सर्व ठिकाणी, बेंदूरच्या दिवशी बैलांची वाजतगाजत बॅड वाजवत, विविध वाद्ये वाजवत गावातून मिरवणूक काढली जाते. शेती व शेतकरी यांचे भावस्पर्शी नातं असलेला बेंदूर सण म्हणजे निसर्गाची आणि बैलांची पूजा, तसेच त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्याची संधी असते.
बेंदूर आणि पोळा याबाबत महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील काही भागात बेंदूर आणि पोळा हे दोन्ही सण बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असले तरी, काही ठिकाणी बेंदूर आणि पोळा हे दोन वेगवेगळे सण मानले जातात.बेंदूर व पोळा हे सण स्थानिक चालत आलेल्या प्रथा परंपरा संस्कृती नुसार चालीरिती नुसार साजरे केले जातात.सारे अनेक मंजिल एक.! या प्रमाणे बेंदूर व पोळा सण उत्सव वेगवेगळ्या पध्दतीने साजरा होत असला तरी बैलांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे व श्रमसंस्कतीचा सन्मान करणे हाच खरा हेतू असतो.बेंदूर व पोळा सण उत्सव वेगवेगळ्या पध्दतीने साजरा होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील काही भागात मान्सूनच्या आगमनाची, शेतीच्या कामांची,पेरणीची कामे वेगवेगळ्या वेळी मान्सूनच्या आगमनानुसार होतात.त्यामुळे बेंदूर व पोळा सण उत्सव वेगवेगळ्या पध्दतीने, वेगवेगळ्या वेळी साजरा केला जातो.
लेखक – अनिलकुमार कदम,
(कवी साहित्यिक मुक्त पत्रकार)
गिरवी, ता. फलटण, जि. सातारा मोबा. 8275214889