स्थैर्य, बीड, दि.१: वैद्यकीय शाखेतील प्रवेशासाठीच्या ‘नीट’ परीक्षेचा पेपर अवघड गेल्याने बीड तालुक्यातील केतुरा येथील एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. विवेक कल्याण रहाडे (१८, रा. केतुरा) असे मृताचे नाव आहे.
शेतकरी कुटुंबातील विवेक बारावीत चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाला होता. त्याचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते. त्याने १५ दिवसांपूर्वी ‘नीट’ परीक्षाही दिली होती. पण पेपर कठीण गेल्याने या परीक्षेत चांगले गुण मिळतील की नाही, याची चिंता त्याला होती. या तणावातून त्याने बुधवारी दुपारी स्वत:च्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण ठाण्याचे सपोनि योगेश उबाळे, पो. ना. राम भंडाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत विवेकचे मामा नवनाथ वांढरे (रा. केतुरा) यांच्या खबरीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
चिठ्ठी व्हायरल : विवेकच्या आत्महत्येनंतर समाज माध्यमांवर एक सुसाईड नोट व्हायरल झाली आहे. यात आपण मराठा समाजाला आरक्षण नसल्याने वैद्यकीय प्रवेशाला पात्र ठरत नसल्याने समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. मात्र, पोलिसांत अशी कुठली नोंद नाही. नातेवाईकांनी तशी माहिती दिलेली नाही. मृतदेहाच्या पंचनाम्यात अशी कुठली चिठ्ठी आढळून आली नव्हती अशी माहिती बीड ग्रामीण ठाण्याचे एपीआय योगेश उबाळे यांनी दिली.